हळदीचा रंग पडला फिका; चार महिन्यांत सहा हजारांनी पडले भाव, शेतकऱ्यांची निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 02:47 PM2024-08-29T14:47:37+5:302024-08-29T14:48:06+5:30
नांदेडमध्ये हळदीचा रंग पडला फिका, प्रतिक्विंटल दर साडेअकरा हजारांवर घसरले
नांदेड : नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात एप्रिल-मे महिन्यांत हळदीचे भाव १८ हजारांवर पोहोचले होते. पण, पेरणीचा हंगाम सुरू झाला अन् भावात पडझड सुरू झाली आहे. मागील चार महिन्यांत नांदेडच्या बाजारात हळदीचे भाव तब्बल सहा ते साडेसहा हजार रुपयांनी घसरले असून, साडेतेरा ते साडेअकरा हजारांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे मोठ्या आशेने ठेवलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
एप्रिल- मे, जून महिन्यांत हळदीला चांगले भाव होते. परंतु, त्यानंतर बाजारात मंदी आल्याने पुन्हा भाव वाढलेच नाहीत. सुरुवातीला शेतकऱ्यांकडून हळदीची खरेदी करीत व्यापाऱ्यांकडून बाजारात साठेबाजी करून ठेवली. पण, चार महिन्यांत दरात मोठी घसरण झाल्याने व्यापारीही अडचणीत आले आहेत.
दरवर्षी काढणी हंगामावेळी हळदीचे भाव चांगले असतात. पण, त्यानंतर वाढण्याची शक्यता कमीच असते. काहीवेळा बाजारात हळद विक्रीसाठी आल्यानंतर कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने मिळेल, त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते. यावर्षी सुरुवातीला कमी असलेले भाव हळद विक्रीसाठी बाजारात आल्यानंतर वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना चांगले दरही मिळाले पण त्यानंतर दिवसेंदिवस हळदीचे भाव कमी होत गेले. बुधवारी नांदेडच्या बाजारात हळदीला प्रतिक्विंटल कमाल १३६००, किमान ११५००, तर सरासरी १३ हजार रुपयांचा भाव मिळाला.
वेअर हाऊसला अनेकांनी हळद ठेवली साठवून
दर वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी हळदीची विक्री न करता, वेअरहाऊसला तर काहींनी घरीच साठवून ठेवली. पण, आता दरात कमालाची घसरण झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत आहेत. यावर्षी हळदीचे पीक चांगले असल्याने पुढच्या वर्षीही बाजारात हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होईल, अशी शक्यता असल्याने दर वाढण्याची आशा धूसर झाली आहे.