मेळाव्यासाठी जाणाऱ्या आमदार रवींद्र वायकरांचा ताफा सकल मराठा समाज बांधवांनी अडवला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:55 PM2023-12-27T17:55:34+5:302023-12-27T18:05:40+5:30

मेळाव्यासाठी पुढे जाण्याचे टाळत आमदार रवींद्र वायकर ताफ्यासह माघारी फिरले.

The convoy of MLA Ravindra Vaikar, who was going to the meeting, was stopped by Sakal Maratha Samaj brothers | मेळाव्यासाठी जाणाऱ्या आमदार रवींद्र वायकरांचा ताफा सकल मराठा समाज बांधवांनी अडवला

मेळाव्यासाठी जाणाऱ्या आमदार रवींद्र वायकरांचा ताफा सकल मराठा समाज बांधवांनी अडवला

- शब्बीर शेख
देगलूर:
देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा ) पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी तालुक्यातील खुतमापूर येथे जाणाऱ्या माजी मंत्री तथा आमदार रवींद्र वायकर यांचा ताफा बुधवारी सकल मराठा समाज बांधवांनी अडवला. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करीत आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका घेत आमदार वायकरांचा ताफा परत पाठविला.

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर 27 डिसेंबर रोजी तालुक्यातील खुतमापूर येथे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ( उबाठा) गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमासाठी माजी मंत्री तथा आमदार रवींद्र वायकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यासह जिल्ह्यातील  अनेक पदाधिकाऱ्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी जात असताना होट्टल फाट्याजवळ सकल मराठा समाज बांधवांनी अडवला.

यावेळी आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी आहे. कोणताही राजकीय कार्यक्रम घेऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सकल मराठा समाज बांधवांनी घेतला. यावेळी वायकर यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. तसेच २३ डिसेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने लोकसभा तयारीचा शहरात कार्यक्रम झाला. त्यास कोणताही विरोध झाला नाही. आम्हालाच विरोध करणे, हा दूजाभाव योग्य नाही, अशी नाराजगी व्यक्त केली. तसेच मेळाव्यासाठी पुढे जाण्याचे टाळत आमदार वायकर ताफ्यासह माघारी फिरले.

पण कार्यक्रम पार पडला
ताफा अडविण्यात आल्याने आमदार वायकर परत गेले. मात्र, शिवसेना ( उबाठा) गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार व  सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील हे अगोदरच कार्यक्रम स्थळी पोहोचले होते. दुपारी एक वाजताच्या दरम्यान पवार आणि पाटील या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला.
 

Web Title: The convoy of MLA Ravindra Vaikar, who was going to the meeting, was stopped by Sakal Maratha Samaj brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.