वादळीवाऱ्यासह गारपिटीमध्ये शेतात अडकलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:30 PM2023-04-28T12:30:29+5:302023-04-28T12:30:53+5:30
अचानक वादळीवारासह गारांचा पाऊस सुरू झाला. शेतात आणि आजूबाजूला कुठेही त्यांना आडोसा मिळाला नाही.
उमरी (नांदेड) : तालुक्यातील बोळसा गंगापट्टी येथील शेतकऱ्याचा गुरुवारी सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे मृत्यू झाला. शेख हुसेन शेख जलालसाब ( ५०, रा. बोळसा गंगापट्टी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शेख हुसेन शेख जलालसाब हे गुरुवारी सायंकाळी आपल्या शेतात गेले होते. यावेळी अचानक वादळीवारासह गारांचा पाऊस सुरू झाला. शेतात आणि आजूबाजूला कुठेही त्यांना आडोसा मिळाला नाही. त्यामुळे ते गारांच्या पावसात तसेच शेतात थांबले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, शेतामध्ये गंभीर अवस्थेत शेख हुसेन शेख जलालसाब आढळून आले. त्यांना रात्री उशिराने उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गारांच्या पावसात भिजल्याने शेख हुसेन शेख जलालसाब यांचा शेतात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
कुटुंबप्रमुखच गेल्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. भगवान मनूरकर यांनी केली आहे.