मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात
By शिवराज बिचेवार | Published: October 3, 2023 09:45 AM2023-10-03T09:45:01+5:302023-10-03T09:45:31+5:30
मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे.
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे आणखी ४ नवजातांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे.
सोमवारी मध्यरात्री १२ ते मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेदरम्यान म्हणजे मागील २४ तासात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला. यात ४ नवजात बालक, ३ प्रौढ यांचा समावेश आहे. त्या अगोदरच्या २४ तासात २४ जणाचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. आता एकूण मृत्यूंची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे.
दरम्यान, आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालक मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण संचालक दिलीप म्हेसेकर नांदेडला येऊन रुग्णालयाची पाहणी करणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
मृत्यूची चौकशी कराच, पण ७० गंभीर रुग्णांचे प्राणही वाचवा-
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
चौकशी समिती आज नांदेडमध्ये-
सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.
अजूनही काही रुग्ण 'सिरीयस'
आता एकूण मृत्यूची संख्या ३१ झाली आहे, अजूनही काही रुग्ण सिरियस आहेत, आयसीयुमधील जास्त रुग्ण आहेत. त्यांची देखभाल केली जात आहे.
- डॉ. वाकोडे (अधिष्ठाता, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नांदेड)