नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार?

By शिवराज बिचेवार | Published: October 4, 2023 08:14 AM2023-10-04T08:14:49+5:302023-10-04T08:15:00+5:30

विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती.

The death toll in Nanded, 36 children in critical condition... Will the victims of indifference stop? | नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार?

नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार?

googlenewsNext

शिवराज बिचेवार

नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर मंगळवारी अत्यवस्थ असलेल्या आणखी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ८  बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अत्यवस्थ असलेले ३६ शिशुंसह ५९ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकारामुळे आरोग्य प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

मृत्यूच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. मंगळवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला आहे.

अत्यवस्थ असलेल्या ‘त्या’ ५९ रुग्णांचे काय?

रुग्णालयात अद्यापही ५९ अत्यवस्थ रुग्ण आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या रुग्णांचा जीव वाचविण्यास प्राधान्य द्या, त्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात येऊन सेवा देण्याचे आवाहन केले आहे; परंतु संवेदनशून्य रुग्णालय प्रशासनाने दुसऱ्या दिवशीही म्हणावी तशी खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येते.

चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री

मुंबई :नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नांदेड येथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. यात कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बाहेरून घ्यावी लागतात औषधे

दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे दाखल होतात; परंतु औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागते.

सलाइन, सिरिंज, रेबीज, सर्पदंश यासारखी औषधेही बाहेरून आणावी लागतात. स्थानिक प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ४० लाख रुपयांची औषधी खरेदी केली होती.

या औषधाचा साठाही आता संपत आला आहे, तर परिचारिकांच्या १०० वर जागा रिक्त आहेत. सिटी स्कॅन, सोनोग्राफी बंद आहेत. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.

२० बालकांचा मृत्यू, ३६ अत्यवस्थ

मागील ४८ तासांत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २० नवजात बालकांचा समावेश आहे, तर आजघडीला ५९ रुग्ण अत्यवस्थ आहेत. त्यापैकी ३६ बालके आहेत. 

    - डॉ. एस. आर. वाकोडे, अधिष्ठाता, शासकीय रुग्णालय, नांदेड

मंत्री मुश्रीफांचा ताफा रोखला

रुग्णालयात पाहणी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे वाहनाने विश्रामगृहाकडे निघणार होते. त्याचवेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा रोखला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: The death toll in Nanded, 36 children in critical condition... Will the victims of indifference stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड