गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले; गोळीचा नेम चुकल्याने तलवारीने वार करत आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 02:43 PM2022-04-30T14:43:05+5:302022-04-30T14:43:48+5:30

गुन्हेगारांकडून सर्रास देशी कट्टयाचा वापर होत आहे.

The firing shook Nanded again; Fortunately no casualties, accused absconding | गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले; गोळीचा नेम चुकल्याने तलवारीने वार करत आरोपी फरार

गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले; गोळीचा नेम चुकल्याने तलवारीने वार करत आरोपी फरार

googlenewsNext

नांदेड - येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा गोळा घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेचा अद्याप उलगडा झाला नसताना नांदेड ग्रामीण हद्दीत तुप्पा भागात शनिवारी पुन्हा गोळीबार झाला. सुदैवाने ही गोळी कोणाला लागली नाही. परंतु आरोपीने तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेड हादरले आहे.

बियाणी यांची त्यांच्या घरासमोरच हत्या करण्यात आली होती. ही घटना ५ एप्रिल रोजी घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये २६ पेक्षा अधिक देशी कट्टे आरोपींकडून जप्त करण्यात आले. तर शुक्रवारी विक्रीसाठी अमृतसर येथून आणलेल्या २५ तलवारी पकडल्या आहेत. असे असताना गुन्हेगारांकडून सर्रास देशी कट्टयाचा वापर होत आहे. शनिवारी दुपारी जवाहरनगर तुप्पा भागात कुख्यात कैलास बिगानिया टोळीतील दिलीप पुंडलिकराव डाकोरे (रा.शंभरगाव ता.लोहा) याने क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर पिंटू कसबे या तरुणावर गावठी कट्टयातून गोळी झाडली. परंतु,डाकोरे याचा नेम चुकला.

त्यानंतर डाकोरे याने तलवारीने कसबे यांच्या पायावर वार केला. त्यात ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपीने पळ काढला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, पो.नि.अशोक घोरबांड यांच्यासह पथकाने धाव घेतली होती.

Web Title: The firing shook Nanded again; Fortunately no casualties, accused absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.