नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत

By राजेश निस्ताने | Updated: March 21, 2025 18:26 IST2025-03-21T18:19:39+5:302025-03-21T18:26:34+5:30

कुख्यात रिंदा हा अनेक राज्याच्या पोलिसांना हवा आहे. मोस्ट वॉन्टेड रिंदा नांदेडचा आहे. तो पाकिस्तानात दडून असल्याचा सुरक्षा एजन्सीला संशय आहे

The ghost of 'most wanted' Rinda comes back to life after a shooting and murder incident near a Gurudwara in Nanded | नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत

नांदेडच्या गुरुद्वारासमोर गोळीबार अन् खुनाच्या घटनेने ‘मोस्ट वॉन्टेड’ रिंदाचे भूत पुन्हा जिवंत

आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर संधू ऊर्फ रिंदा हा मरण पावल्याची वार्ता पसरल्याने नांदेडमधील उद्योजक, व्यापारी बरेच महिने रिलॅक्स होते; परंतु येथील गुरुद्वारा भागात झालेल्या गोळीबार व खुनाच्या घटनेने रिंदाचे भूत पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. त्यामुळे व्यापारी व उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळते.

कुख्यात रिंदा हा अनेक राज्याच्या पोलिसांना हवा आहे. मोस्ट वॉन्टेड रिंदा नांदेडचा आहे. तो पाकिस्तानात दडून असल्याचा सुरक्षा एजन्सीला संशय आहे; मात्र पाकिस्तानात राहूनही तो नांदेडमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांकडून खंडणी गोळा करतो. यावरून त्याची दहशत लक्षात येते. रिंदाच्या कारवायांची माहिती घेण्यासाठी एनआयए, आयबी, एटीएस, सीबीआय या एजन्सी कायम नांदेड पोलिसांच्या संपर्कात असतात. बहुचर्चित बिल्डर संजय बियाणी यांच्या खून प्रकरणात रिंदा टोळीचा सहभाग उघड झाला होता. रिंदाच्या साथीदारांच्या शोधार्थ नांदेड पोलिसांनी दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व इतरही राज्यं पालथी घातली होती. त्यावेळी रिंदाचा अन्नातील विषबाधेने मृत्यू झाल्याची वार्ता पसरली होती. या वार्तेमुळे नांदेडमध्ये खंडणीच्या प्रकरणांना काही काळ ब्रेक लागला होता. व्यापारी वर्गही निश्चिंत झाला होता; मात्र आता पुन्हा रिंदा सक्रिय झाला आहे. 

पोलिसांनी त्यावेळी जाणीवपूर्वक रिंदाच्या मृत्यूची वार्ता पसरविल्याची माहिती आहे. या वार्तेमुळे रिंदा व त्याचे साथीदार बेसावध होतील, एखादी चूक करतील व पोलिसांच्या हाती लागतील, हा त्यामागचा उद्देश होता; मात्र रिंदाच्या मृत्यूची अफवा पसरविण्याचा फंडा फेल ठरला. रिंदा व त्याच्या टोळीकडून होणाऱ्या कारवाया नांदेड पोलिसांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरल्या आहेत. भावाच्या खुनातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपीला संपविण्यासाठी रिंदा टोळीने नुकताच गुरुद्वारा परिसरात भरदिवसा गोळीबार केला; मात्र त्यात आरोपी वाचला. त्याचा साथीदार बळी ठरला. ते पाहता त्या आरोपीला उडविण्यासाठी रिंदा टोळीकडून पुन्हा हालचाली होतील, एवढे निश्चित. एकदा गोळीबार करायचा, त्यातून दहशत निर्माण करायची आणि वर्षभर खंडणी उकळायची हा रिंदा टोळीचा मनसुबा आहे. 

आजही खंडणीसाठी रिंदाचे कॉल येत असल्याचे सांगितले जाते; मात्र कोणी व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. संजय बियाणी खून प्रकरणानंतर व्यापारी, उद्योजकांनी रिव्हॉल्व्हर परवाना मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज करण्याचा सपाटा लावला होता. कोणी तक्रारी देण्यासाठी पुढे येत नसल्यानेच खंडणीखोरांचे फावते आहे. रिंदा टोळीला पकडण्याबाबत पोलिसांच्याही मर्यादा आहेत. थेट पोलिसांनाच धमकी देण्याचेही प्रकार घडतात. एका पोलिस अधिकाऱ्याने रिंदाला गोळ्या घालून ठार मारू असे वक्तव्य खासगीत केले; मात्र हे वक्तव्य खाकीतीलच कुण्या खबऱ्याने रिंदा टोळीपर्यंत पोहोचविले. त्यानंतर रिंदानेच त्या पोलिस अधिकाऱ्याला फोन करून मुलाबाळांना पाहून घेण्याची धमकी दिली. तेव्हापासून हा अधिकारी रिंदा या विषयावर शांतच झाल्याचे सांगितले जाते. रिंदा व त्याचे साथीदार कारागृहातूनही आपल्या कारवाया सुरूच ठेवतात. रिंदा व त्याची टोळी नांदेड पोलिसच नव्हे तर राज्य व देशातील तमाम सुरक्षा एजन्सीसाठी खुले आव्हान ठरले आहे.

रिंदाच कॉल करतोय की आणखी कुणी ?
रिंदाच्या कॉलबाबत नेहमीच संशयाचे वातावरण पाहायला मिळते. रिंदाच्या नावाने दुसरेच लोक कॉल करतात, त्याचे नाव व दहशत वापरून खंडणी उकळतात. त्यामुळे खंडणी खरंच रिंदा उकळतो की त्याच्या नावाचा वापर होतो, याबाबत व्यापारीच नव्हे तर पोलिस यंत्रणेतही कायम संशयाचे वातावरण पाहायला मिळते. या खंडणीपायी अनेकांनी आपले उद्योग, व्यापार शेजारील राज्यात तसेच पुण्याला शिफ्ट केले आहेत. आणखी काही जण नांदेड सोडण्याच्या मानसिकतेप्रत आले आहेत. रिंदाची अटक होईस्तोवर नांदेडमधील व्यापारी, उद्योजकांचा जीव टांगणीला राहील, एवढे निश्चित.

पोलिसातही शीतयुद्ध
पोलिस अधिकाऱ्यांपुढे आंतरराष्ट्रीय दहशतवादी रिंदाच्या अटकेचे आव्हान असताना पोलिस यंत्रणा मात्र अंतर्गत लढाईतच गुंतून पडली आहे. अवैध धंदे बंद करा या पोलिस उपमहानिरीक्षकाच्या आदेशाने जिल्ह्याची संपूर्ण पोलिस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात अधिकारी आपल्या स्तरावरच जमेल तसे 'ॲडजेस्ट' करीत असल्याने कर्मचाऱ्यांना कुणी विचारेना झाले आहे. याच धंद्यावरील धाडीतून दोन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. कंधार तालुक्यातील एका रेती घाटावर वरिष्ठाने धाड घातली होती. त्यानंतर कनिष्ठाने स्वत:कडे वरिष्ठाचा प्रभार असताना पुन्हा त्याच घाटावर धाड घातली. १५ दिवसांत दुसऱ्यांदा धाड कशाला म्हणून त्या वरिष्ठ व कनिष्ठामध्ये शीतयुद्ध पेटल्याचे सांगितले जाते. आजघडीला पोलिसांचे डिटेक्शन दिसते आहे. त्याचा प्रॉपर गाजावाजाही करून घेतला जात आहे. प्रकाशित बातम्या दुसऱ्या दिवशी मोबाइल स्टेटसवर ठेवून कामगिरी दाखविण्याचाही प्रयत्न होतो आहे; मात्र सहा वर्षांपूर्वी आपल्याच एका पोलिस जमादाराचा भरदिवसा झालेल्या खुनातील आरोपी जिल्ह्याच्या तमाम एक्सपर्ट पोलिस यंत्रणेला अद्याप शोधता आलेला नाही. यातच जिल्हा पोलिस दलाचे डिटेक्शनमधील खरे अपयश लपलेले आहे. पोलिसाचा हा खून व त्यातील सहा वर्षांपासून हुलकावणी देणारा मारेकरी स्थानिक तमाम पोलिस यंत्रणेला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

Web Title: The ghost of 'most wanted' Rinda comes back to life after a shooting and murder incident near a Gurudwara in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.