मुलीच्या पायाला त्रास झाला; भानामतीच्या संशयावरून वृद्धास भरचौकात मारहाण, जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 02:03 PM2023-03-03T14:03:08+5:302023-03-03T14:04:35+5:30
जीवघेणा अंधश्रद्धेचा पगडा; भानामतीच्या संशयावरून वृद्धास गावातील चौकात अन् मंदिरासमोरही केली मारहाण
नरसीफाटा/शंकरनगर (जि. नांदेड) : अंधश्रद्धेचा पगडा अजूनही ग्रामीण भागात आहे. एका अठरावर्षीय मुलीला करणी करून भानामती केल्याच्या संशयावरून ८५ वर्षीय वृद्धास भरदुपारी गावातील मंदिरासमोर, चौकात अन् चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण केली. यामध्ये सदर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १ मार्च रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी तिघांविरोधात रामतीर्थ ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील हनमंत काशीराम पांचाळ (वय ८५) यास आरोपींनी त्यांच्या घरी नेऊन तसेच गावातील मंदिरासमोर, चौकात आणि गावातच असलेल्या चिंचेच्या झाडाला बांधून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. वामन डुमणे यांच्या मुलीवर मयत हनमंत पांचाळ याने करणी, भानामती केली, असा आरोप करत रत्नदीप वामन डुमणे, वामन डुमणे (दोघेही रा. गागलेगाव) आणि दयानंद वाघमारे (रा. कागंठी) या तिघांनी संगनमत करून त्यास मारहाण केली.
आरोपीने १ मार्च रोजी दुपारी आरोपी पांचाळ यास घरी नेले. या ठिकाणी ‘तू मुलीवर करणी, भानामती केलास,’ असे म्हणून मारहाण केली. त्यानंतर सायंकाळी मंदिरासमोर आणि झाडाला बांधून मारहाण केली. या मारहाणीत वयोवृद्ध हनमंत पांचाळ याचा जागीच मृत्यू झाला; परंतु गावातील कोणीही त्यांना अडविण्याचा अथवा वाचविण्याचा प्रयत्न केला नसल्याचे बघ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे आणि फौजदार शेख लतीफ, बीट जमदार पठाण यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी बिलोलीच्या रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी १ मार्च रोजी रात्री उशिरा मारोती नागनाथ पांचाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी वामन डुमणे, रत्नदीप वामन डुमणे आणि दयानंद वाघमारे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संकेत दिघे हे करीत आहेत.
तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर लगेचच आरोपी रत्नदीप वामन डुमणे व दयानंद वाघमारे यांनी गावातूनच अटक केली. त्यानंतर २ मार्च रोजी सकाळी तिसरा आरोपी वामन डुमणे यास दुपारी एका शेतातून ताब्यात घेतले.
मुलीच्या पायाला व्हायचा त्रास...
वामन डुमणे यांच्या अठरावर्षीय मुलीवर मयत हनमंत पांचाळ याने करणी केल्याचा संशय डुमणे कुटुंबीयांना होता. त्यातूनच त्यांनी हनमंत पांचाळ यास मारहाण केली. सदर मुलीला पायाला त्रास होत असे. हा त्रास भानामती अन् करणीमुळेच झाल्याचा संशय कुटुंबीयांना होता. त्याच रागातून मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.