बडे दिलवाला बळीराजा;आधी मरणासन्न गोमातेस सांभाळले,आता वासराचे बारसे केले धुमधडाक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 07:04 PM2022-03-15T19:04:15+5:302022-03-15T19:06:29+5:30
देगलूर तालुक्यातील खानापूर येथील मारोती मारजेवाड या शेतकऱ्याने हा अनोखा सोहळा घडवून आणला.
नांदेड : बळीराजाचे प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे. शेतात राबराब करणाऱ्या जनावरांना ते आपल्या कुटूंबातील सदस्यच मानतात. असाच प्रत्यय देगलूर तालुक्यातील खानापूर येथे आला. शेतकऱ्याने चक्क वासराचे बारसे धुमधडाक्यात केले. यावेळी महिलांनी बारश्याचे गीतही गायिले.
देगलूर तालुक्यातील खानापूर येथील मारोती मारजेवाड या शेतकऱ्याने हा अनोखा सोहळा घडवून आणला. मारजवाडे यांना शेतात दोन वर्षापूर्वी एक गाय मरणासन्न अवस्थेत सापडली होती. त्यांनी या गायीला खांद्यावर घेवून घरी आणले. त्यानंतर औषधोउपचार करुन तिचे संगोपन केले. याच गायीने आता वासराला जन्म दिला आहे.
मारजवाडे यांना मुलगी नाही, त्यामुळे या वासरालाच आपली मुलगी समजून त्यांनी त्याचे धुमधडाक्यात बारसे केले. यावेळी महिलांनी पाळणाही हलवत गीत गायीले. तसेच पाहुणे मंडळींना गोड-धोड जेवणही दिले. मारजेवाड यांच्या या अनोख्या सोहळ्याचे परिसरात कौतूक होत आहे.