बियाणींच्या घरी आलेले पत्र खोटे; शेतीच्या वादातून शिक्षकाला गोवण्यासाठी वृद्धाचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:15 PM2022-04-13T18:15:38+5:302022-04-13T18:16:41+5:30
Sanjay Biyani Murder: शिक्षकाला केले वाळू माफिया, धर्माबाद तालुक्यातून आरोपीला केली अटक
नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder) यांच्या हत्येचा कट परभणीत शिजल्याच्या आशयाचे निनावी पत्र बियाणींच्या घरी धडकल्याने पोलिस चक्रावून गेले होते. या प्रकरणात तपासानंतर शेतीच्या वादातून एका शिक्षकाला या हत्येत अडकविण्यासाठी वृद्धाने पोलिसांची दिशाभूल करत हे पत्र पाठविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ७१ वर्षीय वृद्धाला अटक केली आहे.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी भर दिवसा त्यांच्या घरासमोर दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेमुळे नांदेडात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरु आहे. परंतु सोमवारी दुपारी स्पीड पोस्टने बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आले. बियाणी कुटुंबियांनी हे पत्र एसआयटीकडे दिले. त्यात आनंदगरचा दादा पांडूरंग येवले हा असून तो परभणीला आला होता. परभणीतच बियाणी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. आटाळाचा रेती माफिया आहे, परभणीत कोणी बांधकाम व्यावसायिक राहू नये यासाठी बियाणीला ठाेकले अशी मोडक्या-तोडक्या शब्दातील हिंदी भाषा होती.
या पत्रामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. परंतु केवळ तपास भरकटविण्यासाठी किंवा वैयक्तीक वादातून काटा काढण्यासाठी हा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांना आला होता. उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी वेगाने सूत्रे हलविली. त्यानंतर धर्माबाद तालुक्यातील आटाळा येथून विठ्ठल संतराम सूर्यवंशी (७१) या वृद्धाला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपीचा येवले सोबत शेतीचा वाद
आरोपी विठ्ठल सूर्यवंशी आणि पांडूरंग येवले यांच्यात गेल्या काही वर्षापासून शेतीचा वाद होता. बियाणींची हत्या झाल्यानंतर या खूनात येवले यांना अडकविण्यासाठी सूर्यवंशी यानेच ते पत्र पाठविली होती. त्यासाठी तो परभणीला गेला होता. या ठिकाणाहून स्पीड पोस्टने निनावी पत्र बियाणी यांच्या घरी पाठविले. विशेष म्हणजे येवले हे शिक्षक असताना त्यांना रेती माफिया असा उल्लेख आरोपीने पत्रात केला होता.
आटाळा नावावरुन लागले धागेदाेरे
आरोपी सूर्यवंशी याने येवले हा आटाळाचा रेती माफिया असल्याचे पत्रात नमूद केले होते. पोलिसांनी आटाळा गाव गाठून येवले यांची माहिती घेतली. त्यात सूर्यवंशी याच्यासोबत शेतीचा वाद असल्याचे पुढे आला. सूर्यवंशीच्या मागील काही दिवसाच्या हालचालीची माहिती घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेतले.