आवडीच्या ब्रॅन्डची बीअर नसल्याचे सांगताच मॅनेजरचा खंजर खुपसून केला खून, तिघे अटकेत
By शिवराज बिचेवार | Updated: September 2, 2022 17:46 IST2022-09-02T17:45:38+5:302022-09-02T17:46:47+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना पकडले आहे

आवडीच्या ब्रॅन्डची बीअर नसल्याचे सांगताच मॅनेजरचा खंजर खुपसून केला खून, तिघे अटकेत
नांदेड : शहरातील ढवळे कॉर्नर भागात असलेल्या एका वाईन शॉपच्या व्यवस्थापकाला एका विशेष ब्रॅन्डची बीअर आरोपींनी मागितली होती; परंतु तो ब्रॅन्ड उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून वादावादी झाली अन् नंतर आरोपींनी व्यवस्थापकाचा भोसकून खून केला होता. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.
ढवळे कॉर्नर भागात संदीप चिखलीकर यांच्या मालकीचे प्रदीप वाईन शॉप आहे. गुरुवारी रात्री या ठिकाणी काही जण आले होते. त्यांनी व्यवस्थापक माधव वाकोरे यांना बीअर मागितली; परंतु त्या ब्रॅन्डची बीअर नसल्याचे वाकोरे म्हणाले. त्यावर आरोपींनी शॉप उघडलीच कशाला बंद करु टाका म्हणून वाद घातला. त्यानंतर आरोपी निघून गेले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जवळपास पाच जण पुन्हा वाईन शॉपवर आले. यावेळी त्यांनी वाईन शॉपचा लोखंडी दरवाजा उघडून आत प्रवेश केला.
इतर कामगारांना धमकी देत व्यवस्थापक वाकोरे यांना मारहाण करीत बाहेर काढले. त्यानंतर खंजरने त्यांच्यावर वार केले. वाकोरे यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत आरोपींची धरपकड सुरू होती. पाचपैकी तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत.
पंधरा मिनिटातच पहिला जाळ्यात
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटवित पंधरा मिनिटातच एका आरोपीला पकडले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य दोघांना पकडण्यात आले.