औषधी आणून पैसे संपले,आता कसे होणार; डेंग्यूने आजारी मुलाच्या काळजीने मातेस अश्रू अनावर
By शिवराज बिचेवार | Published: October 3, 2023 01:21 PM2023-10-03T13:21:44+5:302023-10-03T13:22:34+5:30
मी पैसे कुठून आणू हे सांगताना या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले.
नांदेड-नांदेड च्या शासकीय रुग्णालयात अजुनही कसा ढिसाळ कारभार सुरू आहे याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील एक आई आपल्या 14 वर्षाच्या मुलाला डेंग्यू झाल्याने नांदेड च्या रुग्णालयात आली आहे. कसेबसे तिकिटापुरते पैसे घेऊन ही आई आपल्या मुलासोबत नांदेड ला आलीये. रुग्णालयात मुलावर उपचार सुरू झाले आहेत मात्र सातशे रुपये किंमतीच्या औषधी बाहेरून आणण्यास डॉक्टरांनी सांगितले. कसेतरी पैसे जुळवून ह्या मातेने आपल्या मुलासाठी बाहेरून औषधी आणली. पण अजूनही औषधी बाहेरून आणाव्या लागतील असे सांगण्यात आले. मी पैसे कुठून आणू हे सांगताना या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले.
रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषधी असल्याचे प्रशासन सांगत आहे, परंतु किरकोळ औषध ही बाहेरून आणावी लागत आहे. यमुना नरवाडे ही महिला उमरखेड तालुक्यातील बाळदि येथून चार दिवसांपूर्वी मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला डेंगूचे निदान झाले. गेल्या चार दिवसांपासून प्रत्येक औषध बाहेरून आणायला लावत आहेत, त्यामुळे आता पदरचे पैसे ही संपले. आता औषध कसे आणायचे अन गावी परत कसे जाणार या चिंतेने यमुना बाई याना अश्रू अनावर झाले