‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:07 AM2024-09-30T06:07:56+5:302024-09-30T06:09:14+5:30
ladki bahin yojana Fraud: सचिन सीएससी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली.
- सुनील चाैरे
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव (जि. नांदेड) : आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सदर रक्कम सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार मनाठा, (ता. हदगाव) येथे उघडकीस आला आहे. लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक गावातून पसार झाला आहे.
सचिन सीएससी सेंटर चालकाने रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले आहेत असे सांगून ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रे जमा केली. बहिणींचे अर्ज भरताना महिलांचा आधार क्रमांक टाकण्याऐवजी पुरुषांचा आधार क्रमांक टाकला. त्यांचा खाते क्रमांकही दिला. जेव्हा पैसे जमा झाले, त्यानंतर रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचे सांगून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम उचलून घेतली.
चौकशीचे आदेश
नेमका काय प्रकार घडला आहे, याची चौकशी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत. अशा प्रकारे कोणत्याही योजनेची रक्कम परस्पर उचलणे हा गुन्हाच आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांची नावे कशी घेतली गेली? यामध्ये कोण कोण सहभागी आहे, हे चौकशीनंतर पुढे येईल. दोषींसह संबंधित केंद्र चालकावर कायदेशीररीत्या गुन्हादेखील दाखल करण्यात येईल.
- अभिजीत राऊत,
जिल्हाधिकारी, नांदेड
असे फुटले बिंग...
मनाठा येथील अलीम सलीम कादरी यांच्या मोबाइलवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचा संदेश आल्याने या घोटाळ्याचे बिंग फुटले. त्यामुळे गावात चर्चा सुरू झाली. मनाठा गावातील ३८ तर बामणी फाटा येथील ३३ भावांचा आधार क्रमांक वापरून ३ लाख १९ हजार ५०० रुपये परस्पर उचलून केंद्रचालक पसार झाला आहे.
शासनाला तर चुना लावला, पण बहिणीच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या अलीम कादरी यांच्या मोबाइलवर संदेश आला, त्याने लगेच सेंटर चालकाला विचारपूस केली. तेव्हा कोणाला सांगू नको, काही होत नाही, असे सेंटर चालकाने सांगितले. तुमची कागदपत्रे परत करतो, असे म्हणून तो सकाळपासून सेंटरला कुलूप लावून पसार झाला.