हात बांधून फेकले वृद्धाला तळ्यात, आठवड्यानंतर मृतदेहाची ओळख पटली
By शिवराज बिचेवार | Published: September 6, 2022 06:24 PM2022-09-06T18:24:57+5:302022-09-06T18:27:53+5:30
ही घटना ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती.
नांदेड- लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरातील मस्की तलावात एका ६५ वर्षीय वृद्धाला हात बांधून फेकण्यात आले होते. ही घटना ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणातील मयताची ओळख पटली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
रावसाहेब ग्यानोबा कांबळे असे मयताचे नाव आहे. ते अहमदपूर तालुक्यातील कुमठा येथील रहिवासी आहेत. १७ ऑगस्ट रोजी ते घरातून बाहेर पडले होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी शेती कामासाठी लोहा तहसील येथे जात असल्याचे सांगितले होते. त्यांच्या कुटुंबीयांचा २६ ऑगस्ट पर्यंत त्यांच्याशी संपर्क होता. परंतु त्यानंतर मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यात ३० ऑगस्ट रोजी मस्की शिवारातील तळ्यात रावसाहेब कांबळे यांचे प्रेत आढळून आले.
पोलिसांनी लगेच चंद्रकांत कांबळे या त्यांच्या मुलाला संपर्क साधून बोलावून घेतले. चंद्रकांत कांबळे यांनी मयताची ओळख पटविली. ग्यानोबा कांबळे यांचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने पाठीमागे बांधलेले होते. या प्रकरणात माळाकोळी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि डोके हे करीत आहेत.