आईवडील वाट पाहत राहिले; घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा ३८ तासानंतर मृतदेहच सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 12:14 PM2022-02-18T12:14:16+5:302022-02-18T12:15:12+5:30
सात वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह कॅनॉल मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.
अर्धापूर (नांदेड) : खेळण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या गणपतनगर येथील चिमुकल्याचा तब्बल ३८ तासानंतर कॅनॉलमध्ये मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. स्वराज संतोष पानपट्टे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
अर्धापूर शहरातील तामसा रोडवरील, गणपत नगर येथील स्वराज संतोष पानपट्टे हा ७ वर्षीय चिमुकला बुधवारी सायंकाळी ६:०० वाजता घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला. बराच वेळानंतरही घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. शेवटी नातेवाईकांनी अर्धापूर पोलीस प्रशासनाला चिमुकला हरवल्याची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी लागलीच शोध कार्य सुरु केले. दरम्यान, आज सकाळी ८:१५ वाजता वसमत फाटा महामार्ग चौकीच्यामागे असलेल्या कॅनॉलमध्ये स्वराजचा मृतदेह आढळून आला. तब्बल ३८ तासानंतर स्वराजचा मृतदेह सापडल्याने त्याची वाट पाहणाऱ्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे,पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे यांच्या सह पंडितराव लंगडे, रेणूक राऊत, कृष्णा लंगडे यांच्यासह अनेकांनी स्वराजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.