खड्डे वाचवताना पुलावर अडकलेला ट्रक नदीत कोसळला, ११ लाखांचा चारा बुडाला
By प्रसाद आर्वीकर | Published: August 28, 2023 03:43 PM2023-08-28T15:43:07+5:302023-08-28T15:43:38+5:30
क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले.
- मारोती चिलपिपरे
कंधार: दोन दिवसांपूर्वी मन्याड नदीचे कठडे तोडून पुलाच्या मधोमध अडकलेला ट्रक शर्थीचे प्रयत्न करूनही बाहेर काढता आला नसून, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास हा ट्रक नदीपात्रात कोसळला आहे.
नांदेड- बिदर राष्ट्रीय महामार्गावरून नांदेडहून उदगीरकडे जाणारा एक ट्रक कंधार तालुक्यातील बहादरपूर येथील मन्याड नदीच्या पुलावर खड्डे चुकवत असताना थेट कठडे तोडून पुलावर अडकला होता. २४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. दोन दिवसांपासून अडकलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी मालकाने प्रयत्न केले. क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले.
अखेर २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चाऱ्यासह हा ट्रक नदीच्या पात्रात कोसळला. या ट्रकमध्ये ११ लाख ५० हजार रुपयांचा मुर्गी चारा होता. याप्रकरणी ट्रक मालक सय्यद सिद्दिकी सय्यद यांनी कंधार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, त्यावरून ट्रक चालक शेख अतिक शेख हारून कुरेशी (रा. देगलूर नाका, नांदेड) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सानप तपास करीत आहेत.