देशी कट्टा विक्रीपूर्वीच पोलिस धडकले; सराईत गुन्हेगार ताब्यात
By शिवराज बिचेवार | Updated: April 22, 2023 17:31 IST2023-04-22T17:30:50+5:302023-04-22T17:31:14+5:30
धनेगावात ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाची धाड

देशी कट्टा विक्रीपूर्वीच पोलिस धडकले; सराईत गुन्हेगार ताब्यात
नांदेड- शहरात इतर राज्यातून देशी कट्टे आणून विक्री करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक टोळी वजिराबाद पोलिसांनी पकडली होती. त्यानंतर २१ एप्रिलच्या रात्री नांदेड ग्रामीण ठाण्यातील डीबी पथकाने धनेगाव भागात एका घरावर धाड मारून आरोपीकडून देशी कट्टा जप्त केला. हा देशी कट्टा आरोपीने विक्री करण्यासाठीच आणला होता.
पोनि अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे प्रमुख पोउपनि आनंद बिचेवार हे २१ एप्रिलच्या रात्री सव्वा नऊ वाजता धनेगाव शिवारात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना खबऱ्याकडून आरोपीकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बिचेवार यांच्यासह पथकाने आंबेडकर नगर भागात लखन नागोराव कोलते याच्या घरावर धाड मारली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता, एक देशी कट्टा आढळून आला. कोलते याने हा देशी कट्टा विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात लखन कोलते याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोलते हा सराईत गुन्हेगार
आरोपी लखन कोलते हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर चोरी, दरोडा, लूटमारी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु पिस्टल बाळगल्याप्रकरणी पहिल्यांदाच तो पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.