शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीमुळे नांदेड जिल्ह्यातील 'स्थानिक' गणित बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:07 PM2022-09-01T19:07:21+5:302022-09-01T19:08:39+5:30

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह: सोशल मीडियावर कुठे टीका, तर कुठे योग्य वेळी योग्य निर्णयाचा सूर

The Shiv Sena-Sambhaji Brigade alliance will change the 'local' politics in Nanded | शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीमुळे नांदेड जिल्ह्यातील 'स्थानिक' गणित बदलणार

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीमुळे नांदेड जिल्ह्यातील 'स्थानिक' गणित बदलणार

Next

- श्रीनिवास भोसले
नांदेड :
 महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना संभाजी ब्रिगेड मागील काही वर्षांपासून राजकीय पर्याय म्हणून उभी राहिली आहे. त्यात शिंदे गटामुळे शिवसेनेला पडलेली खिंडार भरून काढण्यासाठी आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. तसेच आगामी सर्वच निवडणुका सोबत लढणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गणितं देखील बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपंचायतीमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यात अनेक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. भविष्यात राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी झाली तर संभाजी ब्रिगेडला ही संधी मिळेल. दरम्यान, नांदेड जिल्हा परिषदेत सर्वाधिक २८ सदस्य काँग्रेसचे होते. त्याचबरोबर शिवसेनेचे १०, भाजपचे १३, राष्ट्रवादी- १०, रासप आणि अपक्ष प्रत्येकी एक असे एकूण ६३ सदस्य होते.  

राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, जिल्ह्यातील एकमेव आमदार बालाजी कल्याणकर, दोन जिल्हा प्रमुखांसह १४ तालुकाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिकांनी शिंदे गटाशी जवळीक केली.
त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेड सोबत युती झाल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड सह मराठा सेवा संघाच्या सर्वच ३३ कक्षांनी एकजुटीने काम केले तर निश्चित नांदेडातील राजकीय गणितं  बदलतील.

चळवळीतून अनेक गावांत परिवर्तन
संभाजी ब्रिगेडने सामाजिक संघटना म्हणून काम करत असताना गावा-गावात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैचारिक चळवळ उभी केली. आजही बहुतांश गावात संभाजी ब्रिगेडने रूजविलेल्या विचारांचा पगडा पहायला मिळत आहे. त्यात जिजाऊ ब्रिगेडचा देखील महत्वपूर्ण वाटा आहे. दरम्यान, राजकीय पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेडची घोषणा केल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांनी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणे पसंत केले. तर शिवराज्य पक्ष असताना संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष म्हणून घोषित केल्याने अनेकांनी संघटनेला रामराम देखील ठोकला होता.वैचारिक बैठक झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात आजही मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिलेले विचार कायम असल्याचे दिसून येते.

संभाजी ब्रिगेडने अनेकांना घडविले
संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक आंदोलनामध्ये नांदेडचा मोठा वाटा आहे. ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना चांदोजी सूर्यवंशी, माधव पावडे, विठ्ठल पावडे, संतोष गव्हाणे, धनंजय सूर्यवंशी यांनी गावा-गावात कार्यकर्त्यांची वैचारिक फळी निर्माण केली. त्यामुळे नांदेड उत्तर आणि अर्धापूर तालुक्यातील बहुतांश गावात संभाजी ब्रिगेडचे राजकीय वर्चस्व आज सिद्ध झाले आहे.

घरवापसीसाठी प्रयत्न करणे गरजेचे
कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारून अनेकजण इतर राजकीय पक्षांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे मुळ संभाजी ब्रिगेडचे विचार डोक्यात ठेवून इतर पक्षात काम करणाऱ्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न होणेही गरजेचे आहे.

Web Title: The Shiv Sena-Sambhaji Brigade alliance will change the 'local' politics in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.