चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; महिलेचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 12:25 PM2023-12-22T12:25:53+5:302023-12-22T12:26:58+5:30
नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात खोल खड्ड्यात कोसळली.
- दत्तात्रय कांबळे
मुखेड (जि.नांदेड): तालुक्यातील सावरगाव पी. नजिक राज्य मार्ग २२५ वर झालेल्या अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. व्यंकवा कुंचेपु ( ६५ ) असे मृत महिलेचे नाव आहे.
तेलंगाणा राज्यातील कोरटला येथील रहिवाशी कारने ( क्रमांक एम.एच.०२ ए.के.७०६४ ) मध्यराञी मुंबई रवाना झाले. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान सावरगाव नजिक पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खोल खड्ड्यात उलटली. यात कारमधील व्यंकवा कुंचेपु ( ६५ ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर लता सतिश कुंचेपु ( २७), गणेश सतिश कुंचेपु ( ३ ) हे दोघे गंभीर जखमी झाले.तर अमोल्या सतिश कुंचेफु ( ८ ) , सतिश चल्या कुंचेपु ( २९ ) आणि अमोल नरसया निलोड ( २१) हे किरकोळ जखमी झाले.
नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात खोल खड्ड्यात कोसळली. माहिती मिळताच सावरगाव ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. तसेच पोलिस निरिक्षक रमेश वाघ ,पोलिस उपनिरिक्षक भारत जाधव, सिद्धार्थ वाघमारे, भरत जाधव, पंडित राठोड यांनी जखमींना मुखेड येथील उपजिल्हा रुग्नालयात उपचारांसाठी रवाना केले.