नांदेड विमानतळाचा दर्जा आंतरराष्ट्रीय अन् एकही विमान उडेना
By श्रीनिवास भोसले | Published: April 12, 2023 12:09 PM2023-04-12T12:09:34+5:302023-04-12T12:09:51+5:30
आजघडीला या विमानतळाची सुरक्षा रिलायन्सकडे असून केवळ खासगी वैयक्तिक विमानाचे उड्डाण होते.
नांदेड : ''नाईट लँडिंग'' सुविधेसह जम्बो विमान उतरण्याची सुविधा अन् आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले नांदेडचेविमानतळ आता नावालाच उरले आहे. येथून सध्या एकही उड्डाण होत नसल्याने सदर विमानतळ असून अडचण, नसून खोळंबा, असेच काहीसे झाले आहे.
केंद्र शासनाने ''''जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान'''' योजनेत नांदेडचा समावेश करून तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जवळपास साडेचारशे कोटी रुपये खर्चून नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळाचा विस्तार आणि नूतनीकरण करण्यात आले. या ठिकाणावरून कोरोनापूर्वी नांदेड येथून मुंबई, हैदराबाद, औरंगाबाद त्याचबरोबर दिल्ली, चंदीगड, अमृतसर या ठिकाणी विमानसेवा सुरू केली होती. परंतु मुंबईस्थित अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे एक-एक करत सर्व विमानसेवा बंद पडल्या आहेत. आजघडीला या विमानतळाची सुरक्षा रिलायन्सकडे असून केवळ खासगी वैयक्तिक विमानाचे उड्डाण होते.
काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे विमान उतरले होते. तर शेवटचे चार्टर्ड विमान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे १९ मार्च रोजी उतरले होते. प्रवासी वाहतूक करणारी विमानसेवा कोविडमध्ये बंद झाली, त्यानंतर ती सुरूच करण्यात आली नाही. त्याचबरोबर काही दिवसांपासून नाइट लँडिगदेखील बंद झाल्याची बाब तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुढे आली.
राजकीय नेत्यांचा पाठपुरावा
नांदेड येथून मुंबई, दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु, कोविडनंतर विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे नांदेडचा औद्योगिकदृष्ट्या विकासही खुंटत आहे. नांदेडला बुलेट ट्रेन येईल तेव्हा येईल. परंतु, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार असून त्यावरून सेवा मिळू शकत नाही, ही राजकीय अनास्थाच म्हणावी लागेल. सत्ताधारी भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना विमानसेवा सुरू करण्याबाबतची निवेदने दिली. परंतु, अद्यापपर्यंत एकही सेवा सुरू झाली नाही.