दारुड्या मुलाचा त्रास, मारहाण असह्य झाले; आईनेच सुपारी देऊन त्याला कायमच संपवलं
By शिवराज बिचेवार | Published: August 17, 2022 05:53 PM2022-08-17T17:53:37+5:302022-08-17T17:54:29+5:30
अनेकवेळा समजूत घातल्यानंतरही मुलगा दारूच्या पैशांसाठी आई वडिलांना मारहाण करून त्रास देत होता.
नांदेड- दारूच्या व्यसनापायी पैशांची मागणी करीत मुलाकडून आई-वडिलांना नेहमी मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे कंटाळलेल्या आईने दोघांना सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाचाच काटा काढला. ही घटना बारड शिवारात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला असून आईसह सुपारी घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी बारड शिवारात कॅनॉलच्या शेजारी सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पंचनामा केल्यानंतर मयत सुशील याच्या गळ्यावर व्रण आढळून आले. तसेच डोक्यावर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात बारड पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मयत सुशील श्रीमंगले हा मजूर असून तो नांदेडच्या गीतानगर येथील रहिवासी होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने आपल्याकडे घेतला.
पोनि.द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.पांडुरंग माने, सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, पोहेकॉ मारोती तेलंग, गुंडेराव करले, विठ्ठल शेळके, देवा चव्हाण, मोतीराम पवार, महेजबीन शेख, हनुमानसिंह ठाकूर, शेख कलीम यांचे पथक तपास करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व प्रथम मयत श्रीमंगले याचे घर गाठून चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही भाडेकरूंची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.
मयत सुशील श्रीमंगले याला दारूचे व्यसन होते. त्यातून तो आई शोभा श्रीमंगले आणि वडिलांना नेहमी मारहाण करीत होता. अनेकवेळा समजूत घातल्यानंतरही तो दारूच्या पैशांसाठी त्रास देत होता. तसेच घर विकून पैशांची मागणी करीत होता. नेहमी होत असलेल्या या त्रासाला कंटाळून शोभाबाई यांनी मुलगा सुशीलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. शोभाबाई यांच्या घरी किरायाने राहत असलेल्या राजेश गौतम पाटील आणि विशाल देवराव भगत या दोघांना त्यासाठी शोभाबाई यांनी सुपारी दिली. त्यानंतर या दोघांनीही सुशीलला बारड परिसरात नेले. या ठिकाणी गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून बारड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
५० हजारांची सुपारी
शोभाबाई यांनी मुलगा सुशीलचा खून करण्यासाठी त्यांच्याच घरी भाड्याने राहत असलेल्या राजेश गौतम पाटील आणि त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना गळ घातली. त्यासाठी शोभाबाई यांनी दोघांनाही ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे दोघांनीही सुशीलचा खून केला. परंतु पोलिसांच्या चौकशीत बोबडी वळाली अन् ते पोलिसांच्या हाती लागले.
खून करून भगत पुण्यात
बारड परिसरात सुशीलचा खून केल्यानंतर विशाल भगत हा पुण्याला पळून गेला होता. तर इकडे पोलिसांनी सुशीलचे घर गाठून राजेश पाटील आणि शोभाबाई यांची कसून चौकशी केली. त्यांच्या चौकशीत खुनाचा उलगडा झाल्यानंतर पुणे येथून विशालला बेड्या ठोकण्यात आल्या.