आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:10 PM2024-10-28T13:10:29+5:302024-10-28T13:16:09+5:30
हदगाव, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. या तीनही जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे.
नांदेड : जिल्ह्यातील एकूण नऊपैकी पाच मतदारसंघांतील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहे. परंतु, महायुतीने अद्याप नांदेड दक्षिण, देगलूर आणि हदगाव येथील उमेदवार घोषित केला नाही. तर महाविकास आघाडीमध्ये नांदेड उत्तरच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. सदर जागा काँग्रेसला सुटल्याच्या वावड्या उठलेल्या असताना निष्ठावंत शिवसैनिकांनी ‘मातोश्री’कडे सदर जागा उद्धवसेनेकडेच ठेवण्याचा अट्टाहास धरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने सर्वाधिक सहा मतदारसंघांत आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मुखेडमध्ये माजी आमदार हणमंत बेटमोगरकर, नांदेड दक्षिणमध्ये आमदार मोहनराव हंबर्डे, देगलूरमध्ये निवृत्तीराव कांबळे, नायगाव- डॉ. मीनल खतगावकर, भोकर-तिरूपती कोंढेकर, हदगाव-आमदार माधवराव जवळगावकर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने किनवटमध्ये माजी आमदार प्रदीप नाईक तर लोहा मतदारसंघात उद्धवसेनेने एकनाथ पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता केवळ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणे शिल्लक आहे.
महायुतीत भाजपने किनवट- आमदार भीमराव केराम, मुखेड- आमदार डॉ. तुषार राठोड, नायगाव- आमदार राजेश पवार, भोकर- श्रीजया चव्हाण तर लोहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी खासदार प्रतापराव चिखलीकर तर शिंदेसेनेने नांदेड उत्तरमध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांना मैदानात उतरविले आहे. परंतु, हदगाव, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. या तीनही जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदार जितेश अंतापूरक यांची धाकधूक वाढली आहे. त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.