ठाकरे गटाला आठ दिवसानंतर आली जाग; आमदार संतोष बांगरच्या फोटोला जोडे मारो
By शिवराज बिचेवार | Published: June 5, 2023 06:12 PM2023-06-05T18:12:15+5:302023-06-05T18:12:42+5:30
आमदार संतोष बांगर यांनी आपल्या खास शैलीत सचिव विनायक राऊत आणि संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यावर टिका केली होती.
नांदेड- हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शहरात झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात ठाकरे गटाच्या विनायक राऊत आणि संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टिका केली होती. या घटनेच्या आठ दिवसानंतर ठाकरे गटाला सोमवारी जाग आली असून आयटीआय चौक परिसरात बांगर यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच बांगरला नांदेडात फिरु देणार नाही, असा इशारा दिला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नांदेड उत्तर मतदार संघात विकासकामांचे भूमीपुजन करण्यात आले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये शिंदे गटाचा तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांनी आपल्या खास शैलीत सचिव विनायक राऊत आणि संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यावर टिका केली. यावेळी टिका करताना बांगर यांची जीभ नेहमीप्रमाणे घसरली होती. त्यावेळी बांगर यांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली.
परंतु तब्बल आठ दिवसानंतर ठाकरे गटाला या वक्तव्याची आठवण झाली. अन् सोमवारी त्यांनी बांगर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे म्हणाले, बांगर हा नेहमीप्रमाणे बरगळतो. अशाचप्रकारे वक्तव्य केल्यास त्याला नांदेडात फिरु देणार नाही, असा इशारा दिला. तर माधव पावडे यांनी बांगर यांनी शिंदे यांच्यापुढे मी कसा मोठा आहे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे म्हटले.