महायुती अन् महाविकास आघाडीच्या घमासानमध्ये राज्यात शेतकरी नेत्यांची तिसरी आघाडी
By शिवराज बिचेवार | Published: July 15, 2024 01:35 PM2024-07-15T13:35:04+5:302024-07-15T13:36:23+5:30
शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तिसरी आघाडी
नांदेड : राज्याच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडीत घमासान सुरू असताना शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता राज्यभरातील शेतकरी नेत्यांनी तिसरी आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात अनेक शेतकरी संघटनांचे नेते, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या मंडळींची येत्या १८ जुलै रोजी पुणे येथे बैठक होणार आहे.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा होणार आहे. राज्यात महायुतीत भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष आहेत. तर दुसरीकडे विरोधी बाकावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्यात सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात उलथा-पालथी झाल्या. फोडाफोडीच्या राजकारणाला तर ऊत आला आहे. कोण कोणत्या पक्षात आहे हे कळायला मार्ग नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी यासारखे जिव्हाळ्याचे विषय मागे पडले आहेत.
एकेकाळी राज्याच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविणाऱ्या शेतकरी संघटनेची शकले पडली आहे. प्रत्येकाने वेगळी चूल मांडली असली तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र कायम ते आवाज उठवित असतात. त्यामुळे आता या सर्व मंडळींना एकाच छताखाली आणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी माजी आमदार शंकर धोंडगे, वामनराव चटप, रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी चळवळ आणि सामाजिक संघटनांतील अनेकांची येत्या १८ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा सक्षम पर्याय देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तिसरी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात असण्याची दाट शक्यता आहे.
एकाच मुशीतून सर्वजण घडलेले
शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांवर सातत्याने त्या-त्या भागात आवाज उठविणारे वेगवेगळ्या पक्षातील, संघटनेतील नेते हे एकाच मुशीतून घडलेले आहेत. सध्याच्या फोडाफोडीच्या आणि पाडापाडीच्या राजकारणात मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. त्यामुळे एक भूमिका घेऊन आम्ही तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत आहोत. राज्यात तेलंगणाचे विकासाचे मॉडेल आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने तेलंगणात बीआरएसचा पराभव झाला. आता बीआरएससोबत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणार्या मंडळींना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.
- माजी आमदार शंकर धोंडगे.