मराठवाड्याचा वाघ गेला, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:23 PM2023-01-01T15:23:39+5:302023-01-01T15:27:42+5:30
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं.
नांदेड : मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. वयाच्या 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेल्या धोंडगे यांनी आपली राजकीय कारकिर्दी गाजवली. त्यामुळेच, शेकापमध्ये असतानाही त्यांचा कामाचा आणि राजकीय उंचीचा राज्याच्या राजकारणात वेगळाच दबदबा होता.
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातून आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम असो कि, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो मोठ-मोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. जनतेवरचं त्यांचं प्रेम आणि जनतेचा भाईंवरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहचले.
१९७५ साली आणीबाणीचा विरोध करताना १४ महिने कारावास भोगला. यात विशेष म्हणजे आणिबाणीनंतर १९७७ मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकली आणि दिल्लीत आपले वजन निर्माण केले. पण याच नेत्याला १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या रोहिदास चव्हाण यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला आणि तोही त्यांनी मोठ्या मानाने स्वीकारला होता. शरद पवारांचा भरस्टेजवर मुका घेण्याचं धाडस त्यांनी एका कार्यक्रमातून दाखवून दिलं होतं.