बहिणीसोबत जाणाऱ्या तरुणास दोघांनी अडवले; तलवारीच्या धाकावर रोख रक्कम लुटून पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:41 PM2022-03-15T17:41:05+5:302022-03-15T17:42:29+5:30
पोलिसांनी पाठलाग करून एकास ताब्यात घेतले.
नांदेड: रुग्णालयातून बहिण व मावशीला घरी घेवून जाणाऱ्या एका २० वर्षीय तरुणास दोघांनी पाठलाग करत तलवारीचा धाकावर लुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी लातूर फाटा येथे घडली. दरम्यान, नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर अन्य एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून पळून गेला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते लातूर महामार्गावरील आदिती हॉटेलच्यामागील परिसरातील रहिवासी प्रशांत गवाले सोमवारी सायंकाळी सहा वाजेचे दरम्यान, कॅन्सर हॉस्पिटलमधून बहिण व मावशीला घेऊन घरी जात होता. दरम्यान, दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यात अडवून तलवार दाखवत घरातील त्या मुलींना घराबाहेर काढ, नाही तर एक हजार रूपये दे. नाही, तर तुला खतम करू, असे धमकावले. प्रशांत यांनी लागलीच खिशातील १ हजार रुपये दिले.
दरम्यान, हा घटनाक्रम पाहणाऱ्या प्रशांतच्या शेजाऱ्यांनी '११२' क्रमांकावर कॉल करून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने दोघेही चोरटे पळाले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून एकास ताब्यात घेतले. तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यास यशस्वी झाला. पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचे नाव तेजपालसिंग कुलवंतसिंग चाहेल (वय-२८, रा. जुना कौठा नांदेड) असे आहे तर सैंटीस माने (वय-२०, रा. जुना कौठा नांदेड) हा फरार आहे, अशी माहिती तपासिक अंमलदार तथा सहाय्यक पो. नि. सुरेश थोरात यांनी दिली.