धावत्या रेल्वेतच महिलेनं दिला बाळाला जन्म, गाडीतील डॉक्टर धावले मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:51 PM2022-04-28T16:51:47+5:302022-04-28T16:52:40+5:30
महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळाची व आईची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही आरोग्य सुविधा पोहोचल्याच नाहीत. विदर्भाकडील आदिवासी भागातील काही वाड्या-वस्त्यांमध्ये आजही रुग्णावाहिकेचा सायरन वाजत नाही. त्यातून, सर्वसामान्य, गरिब, आदिवासी कुटुंबीतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवताना मोठा संघर्ष करावा लागतो. कोरोना लॉकडाऊन काळात अनेकदा हे चित्र आपण पाहिले आहे. तर, महिलांच्या प्रसुतीचीही सुविधान नसल्याने मोठी हेळसांड होते. आता, परळी ते आदिलाबाद धावत्या पॅसेंजर रेल्वेमध्येच महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
किनवट आदिवासीबहुल भागातील महिलांची प्रसुती सुखरूप व्हावी आणि बाळांचे मृत्यूदर कमी व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व स्तरावर गरोदर मातेच्या प्रसुतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या राबवल्याही जात आहेत. मात्र, अनेकदा या सुविधांचा अभाव जाणवतो. नुकतेच, प्रसुतीच्या कळाने व्याकूळ असलेल्या एका 36 वर्षीय प्रवाशी महिलेने परळी ते आदिलाबाद धावत्या पॅसेंजर रेल्वेमध्येच बोळाला जन्म दिला. महाराष्ट्र शासनाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप शिंदे यांच्या मदतीने महिलेची प्रसुती पार पडली.
महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळाची व आईची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या प्रवासी महिलेचे नाव नाजुका अनिल कवडेकर असून ही महिला परळी ते आदीलाबादकडे जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेने भोकर येथून बोधडीकडे प्रसुतीसाठी आपल्या माहेरी जात होती. त्यावेळी, अचानकच धावत्या रेल्वेमध्येच प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने ती बेचैन झाली होती. किनवट आदिवासी बहुल भागातील इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्र भरारी पथकाचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप शिंदे हेही याच रेल्वेने कर्तव्यावर जाण्यासाठी प्रवास करत होते. डॉ. शिंदेंच्या ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसुतीच्या कळानी व्याकूळ असलेल्या नाजुका अनिल कवडेकर या प्रवासी महिलेला व त्याच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना व इतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन महिलांना विश्वासात घेऊन प्रसूती सुखरूप करून गोंडस बाळाला आणि त्याच्या आईला सुखरूप वाचवले आहे.
दरम्यान, सध्या दोघांचीही तब्येत ठणठणीत असून हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात महिला पुढील उपचार घेत आहे, अशी माहिती मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप शिंदे यांनी दिली. शिंदेच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांचं नातेवाईक आणि इतर प्रवाशांकडून कौतुक करण्यात आलं.