सेक्सटॉर्शनमध्ये अडकलेला तरुण आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडला, पण...; काय झालं पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:14 PM2022-05-30T12:14:27+5:302022-05-30T12:14:41+5:30
तरुणाने आईच्या मोबाइलवरून काही दिवसांपूर्वी एका युवतीशी संपर्क केला होता.
नांदेड : सोशल मीडियावर अनोळखी तरुणींकडून सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढतच आहेत. अशातच सेक्सटॉर्शनमध्ये अडकलेला एक तरुण चार दिवसांपूर्वी घर सोडल्यानंतर आत्महत्येचा विचार करीत होता. बसस्थानक परिसरात गस्तीवर असलेल्या वजिराबाद पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. स्वत: परभणीचा असल्याचे सांगितल्यानंतर परभणीचा खासदार कोण? याचे उत्तर मात्र त्याला देता आले नाही, त्यानंतर पोलिसांनी समुपदेशन करुन कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
तरुणाने आईच्या मोबाइलवरून काही दिवसांपूर्वी एका युवतीशी संपर्क केला होता. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तरुणीने नग्न अवस्थेत संवाद साधला. तरुणानेही तिला प्रतिसाद दिला. त्यानंतर सदरील तरुणीने आक्षेपार्ह व्हिडिओ आई आणि इतर कुटुंबीयाकडे पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणाने आईच्या खात्यातून ३० हजार रुपये ऑनलाईन पाठविले. परंतु त्यानंतरही त्रास देणे सुरूच होते. त्यामुळे हताश झालेल्या तरुणाने आत्महत्येच्या विचारात चार दिवसांपूर्वी घर सोडले होते.
शनिवारी रात्री वजिराबादचे पोउपनि. प्रवीण आगलावे आणि कर्मचारी संतोष बनसोडे हे गस्त घालत होते. त्यावेळी बसस्थानक परिसरात हा तरुण त्यांना आढळला. आगलावे यांनी त्याला जवळ बोलावून विचारपूस केली. त्या तरुणाने परभणीचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानंतर आगलावे यांनी परभणीचा खासदार कोण? असा प्रश्न केला. परंतु त्याला उत्तर देता आले नाही. त्यानंतर आगलावे यांनी त्याला ठाण्यात आणले. ठाण्यात आल्यानंतर तरुणाने आपबिती सांगितली. घरी आईला काय सांगावे म्हणून आत्महत्येचा विचार करीत असल्याचे तो पोलिसांना म्हणाला. पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले.
सेक्सटॉर्शनच्या तक्रारी देण्याचे आवाहन
शहर व जिल्ह्यात रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत ऑनलाईन राहत असलेल्या तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकविले जाते. सुरुवातीला जुजबी बोलणे करण्यात येते. त्यानंतर नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल करण्यात येतो. समोरील व्यक्तीने प्रतिसाद दिल्यानंतर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो. हा व्हिडिओ कुटुंबीय आणि मित्रांना पाठविण्याची धमकी देत पैशांची मागणी होते. परंतु अनेक प्रकरणात तक्रारीच दाखल होत नाहीत.