'तिला बँकेत नोकरी करयाची होती पण...', रस्ता सोडून घरात घुसलेल्या ट्रकने तरुणीस चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:32 PM2022-09-26T13:32:51+5:302022-09-26T13:33:06+5:30
देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावर आज सकाळी अचानक एक भरधाव ट्रक रस्त्याच्या खाली उतरला.
अर्धापूर ( नांदेड ) : चालकाचे नियंत्रण सुटल्याने घरात घुसलेल्या भरधाव ट्रकने एका २१ वर्षीय तरुणीस चिरडल्याची घटना आज सकाळी देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावरील पार्डी येथे घडली. ट्रकखाली येऊन दोन बाईकचा चुराडा झाला आहे. वर्षा माणिकराव मदने असे मृताचे नाव आहे.
देळुब ते नांदेड मुख्य रस्त्यावर आज सकाळी अचानक एक भरधाव ट्रक रस्त्याच्या खाली उतरला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या माणिकराव मदने यांच्या घरात घुसला. यावेळी घरात असलेली वर्षां या अपघातात गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, पोउनी साईनाथ सुरवसे, महेंद्र डांगे आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
हुशार आणि होतकरू तरुणीच्या मृत्यूने हळहळ
वर्षा ही अत्यंत हुशार आणि होतकरू तरुणी होती. ती बीएससीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. यासोबत घरी खाजगी शिकवणी घेऊन घरखर्चाला हातभार लावत असे. तिला बँकेतील नोकरीसाठी संधी उपलब्ध झाली होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मृत वर्षाच्या पश्चात आई-वडील, दोन मोठ्या बहिणी व एक छोटा भाऊ असा परिवार आहे. तिच्या अपघाती मृत्यूची वार्ता गावात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.