मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे
By प्रसाद आर्वीकर | Published: December 21, 2023 01:37 PM2023-12-21T13:37:50+5:302023-12-21T13:38:08+5:30
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
- शेखर पाटील
मुखेड : भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मुखेड येथे आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला मराठा समाजातील युवकांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडला.
चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या अंतर्गत मुखेड येथे भाजपच्या शंभर वॉरिअर्सची बैठक २१ डिसेंबर रोजी आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचा गाड्यांचा ताफा गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुखेड शहरात येत होता. त्याचवेळी नरसी राज्य रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ पाच ते सहा युवकांनी खिशातून काळे झेंडे काढून बावनकुळे यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर जोरदार आंदोलन केले.
राज्य शासन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी युवकांनी दिल्या. हा सर्व प्रकार होत असतानाच पोलिसांनी तातडीने या युवकांना ताब्यात घेतले आहे.