कुंटूरला दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:37+5:302021-02-09T04:20:37+5:30
विवाहितेचा छळ हदगाव : तालुक्यातील उमरी येथील विवाहितेचा ऑटो घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून छळ करणाऱ्या ...
विवाहितेचा छळ
हदगाव : तालुक्यातील उमरी येथील विवाहितेचा ऑटो घेण्यासाठी १ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तीन वर्षांपासून आरोपी छळ करीत होते, अशी तक्रार विवाहितेने पोलिसात दिली. अर्धापूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली.
जि.प. सभापतींची भेट
हदगाव : तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती संजय बेळगे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक मिलिंद देशमुख, मधुकरराव सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम उपस्थित होते. प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोदलवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
शेतकऱ्यांचे अनुदान वाटप
नरसीफाटा : नरसी येथील मध्यवर्ती जिल्हा बँकेने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू केले. बँकेचे व्यवस्थापक एन.के. राऊत, कर्मचारी एस.एस. कोत्तावार, व्ही.व्ही. शिंदे, ए.बी. मोरे, पी.के. हळणे आदींनी याकामी परिश्रम घेतले.
बालकांना पोलिओ डोस
किनवट : तालुक्यातील ० ते ५ वयोगटातील २६ हजार ७६४ पैकी २४ हजार ३८१ बालकांना लस पाजण्यात आला. त्याची टक्केवारी ९१.०९ एवढी होते. नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी बालकाला डोस पाजवून मोहिमेचा शुभारंभ केला.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट
मुदखेड : आमदुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेला जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बालाजी पाटील जाधव, बालाजी पंडित, भीमराव पवार, पांडुरंग पवार, केशव पवार, सुभाष पवार, तुकाराम पवार आदी उपस्थित होते.
सूर्यवंशी यांना पीएच.डी.
हिमायतनगर : करंजी येथील रहिवासी डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. मराठवाड्यातील आदिवासी जमातीचे दारिद्रय या विषयाचा प्रबंध त्यांनी डॉ.एस.डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाला सादर केला होता. करंजी येथे सूर्यवंशी यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सरपंचपदी शिंदे
लोहा : तालुक्यातील जोमेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दिगंबर शिंदे तर व्हाइस चेअरमनपदी शंकर भुरे यांची निवड झाली. यावेळी संचालक प्रदीप शिंदे, व्यंकटराव शिंदे, नामदेव वैजाळे, बालाजी शिंदे, गंगाबाई शिंदे, केशव शिंदे, मारोती पवार उपस्थित होते.
संचालक मंडळाची बैठक
लोहा : येथील विविध सेवा सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत माजी आ. रोहिदास चव्हाण यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवावी, असा ठराव पारित करण्यात आल्याची माहिती संचालक नागनाथ पाटील यांनी दिली. यावेळी चेअरमन गोविंद चव्हाण, व्हा. चेअरमन रामकिशन पारेकर, संचालक संभाजी पाटील आदी उपस्थित असल्याची माहितीही नागनाथ पाटील यांनी दिली.
रा.काँ.ची बैठक
हिमायतनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक लक्ष्मणराव शक्करगे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर पंचायतच्या आगामी निवडणुकीबाबत ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील पतंगे व अन्य उपस्थित होते.
रमाई जयंती साजरी
अर्धापूर : शहरात माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, उपाध्यक्ष डॉ. वाठोरे, प्रा. अविनाश नाईक, दिनेश लोणे, संघरत्न कंधारे आदी उपस्थित होते.
सावित्री रेड्डीचे यश
नायगाव : तालुक्यातील मौजे टाकळी येथील सावित्री गणपत रेड्डी या आठवीतील विद्यार्थिनीने कला हर्ष स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तिला शिक्षक एस.एम. नखाते यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल तिचे अनेकांनी स्वागत केले.
मुकुंद जोशी सेवानिवृत्त
निवघा :- हस्तरा, ता. हदगाव येथील पोस्टमास्तर मुकुंद जोशी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला डाक अधीक्षक विश्वनाथ पद्मे, गिरी, चौरे, नितीन कदम, बालाजी नागटीळक, पाईकराव, छाया कदम, शंतनू सूर्यवंशी, संदीप कदम, संदीप वाढोणकर, गजाननराव पाटील, केशव बंबरुळे, अविनाश बंबरुळे आदी उपस्थित होते.