नांदेडात ट्रॅफिकमध्ये अडकल्याने चोरटे लागले हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:11 AM2018-01-21T00:11:25+5:302018-01-21T00:12:07+5:30
शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायपास रोडवर डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूचा धाक दाखवित अडीच लाख रुपये पळविल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली़ या प्रकरणातील आरोपींनी गुन्ह्यात स्विफ्ट गाडी वापरली होती़ शुक्रवारी सायंकाळी ही गाडी रस्त्यावरुन भरधाव जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीवर पाठलाग करुन अडविली़ यावेळी गाडीतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तर आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायपास रोडवर डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूचा धाक दाखवित अडीच लाख रुपये पळविल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली़ या प्रकरणातील आरोपींनी गुन्ह्यात स्विफ्ट गाडी वापरली होती़ शुक्रवारी सायंकाळी ही गाडी रस्त्यावरुन भरधाव जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीवर पाठलाग करुन अडविली़ यावेळी गाडीतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली तर आणखी तिघांचा शोध घेण्यात येत आहे़
शेख इसाक अब्दुल मजीद रा़नांदुरा पेठ मोहल्ला यांनी १४ जानेवारी रोजी त्यांच्या मालकाने उधारीने विक्री केलेल्या म्हैस विक्रीचे अडीच लाख रुपये घेवून बायपास रोडवर उभे होते़ बायपास रोड येथून एका आॅटोत बसून ते बसस्टँन्डकडे जात होते़ थोड्याच अंतरावर मागाहून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्टमधील दोघे जण उतरले़ त्यांनी आॅटो अडवून शेख इसाक अब्दुल मजीद यांना तुमच्या मालकाने खराब म्हैस दिली असून आमचे पैसे परत कर असे म्हणत शेख इसाक यांना आॅटोतून ओढले़ त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून गाडीत कोंबले़ यावेळी चाकूचा धाक दाखवून शेख इसाक यांच्याकडील अडीच लाख रुपये घेवून ते पसार झाले़ याप्रकरणी शेख इसाक यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती हे इतर कर्मचाºयांसह रस्त्यावर शेख इसाक यांच्याशी चर्चा करीत होते़ इसाक यांनी सांगितलेल्या वर्णनाची स्विफ्ट गाडी त्यांच्या समोरुन भरधाव वेगात गेली़ इसाक यांनी ही गाडी ओळखली़ त्यानंतर सपोनि भारती यांनी सोबत सपोनि मद्दे यांना घेतले़ गाडीचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी सपोनि पिसे यांची दुचाकी घेतली़
थोड्याच अंतरावर ही गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली़ त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवून संतोष व्यंकटराव कोकाटे (रा़ चिखली) व चंदू महादू लोणे (रा़ सावंगी) या दोघांना गाडीतून ताब्यात घेतले़ विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींची चौकशी करण्यात आली़ यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली़
या प्रकरणात आणखी तीन आरोपींचा समावेश असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे़ पुढील चौकशीसाठी आरोपींना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़