नांदेड शहर व जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:14 AM2019-05-03T00:14:58+5:302019-05-03T00:15:22+5:30
नांदेड : शहर व जिल्ह्यात गत दोन दिवसात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे़ एकट्या अर्धापूर शहरात एकाच रात्रीत चार दुकाने ...
नांदेड : शहर व जिल्ह्यात गत दोन दिवसात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे़ एकट्या अर्धापूर शहरात एकाच रात्रीत चार दुकाने फोडण्यात आली़ तर दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न फसला़ नांदेड शहरात तीन आणि कंधारमध्ये एका ठिकाणी अशा एकुण आठ चोरीच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे चोरट्यांची हिमंत वाढली अशाच प्रतिक्रिया नागरीकातून येत आहेत़
अर्धापूर शहरातील तामसा मार्गावर असलेले दोन दवाखाने, किराणा दुकान व कृषी सेवा केंद्र असे चार शटर तोडून जवळपास २५ हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली़ ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली़ चोरट्यांचा हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे़ या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तामसा मार्गावर असलेले डॉ. गजानन कड यांच्या 'परी रुग्णालयात अज्ञात तीन चोरट्यांनी शटर तोडून आतील गल्यामधील अंदाजे १५ हजार रुपए रक्कम लंपास केली. हा प्रकार सीसी टिव्ही कॅमेºयात कैद झाला आहे. त्यानंतर शेजारीच असलेल्या राजेश मामीडवार यांच्या अक्षय किराणा दुकान तोडून नगदी ५ हजार रुपए, डॉ.शिवाजी देशमुख यांच्या कामाई मेडीकल येथील नगदी ४ हजार ३०० रुपये असे तिन्ही ठिकाणी शटर तोडून रोख २५ हजार लंपास केली़ तर वसंत कदम यांच्या कृषी केंद्राचे व हनुमंत राजेगोरे यांच्या सद्गुरु अग्रो क्लिनिकचे शटर तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती.
सरपंनगरात भरदिवसा घरफोडीची घटना
शहरातील सरपंच नगर भागातील दत्त विला मधील पत्रकार नरेश दंडवते यांचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडले़ ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़ चोरट्यांनी यावेळी ८ तोळे सोने, ५ हजार रोख आणि चांदी असा ऐवज लंपास केला़
गेल्या काही दिवसांपासून भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ दुचाकीवरुन आलेले चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाईल लंपास करीत आहेत़ त्याचबरोबर शस्त्राचा धाक दाखवून लुटीचे प्रकारही वाढले आहेत़ गुरुवारी भावसार चौकातील दत्त विला मध्ये राहणारे नरेश दंडवते हे घराला कुलूप लावून पत्नीसह आनंद नगर भागातील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेले होते़
घरी परत आले असताना त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले़ घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करुन टाकण्यात आले होते़ चोरट्यांनी घरातून ८ तोळे सोने, ५ हजार रुपये रोख आणि चांदी लंपास केले़
तांब्याची तार लंपास
कंधार येथे महावितरणच्या कार्यालयातून चोरट्यांनी ४३ हजार रुपये किमतीची ६२ किलो तांब्याची तार लंपास केली़ तर शहरात महाराणा प्रताप चौक भागात धनराज जमदाडे या तरुणाच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकाविला़
गेल्या काही दिवसापासून शहरातील विविध भागात सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाºया वृद्ध आणि महिलांना चोरटे टार्गेट करीत आहेत़