...तर काशीपर्यंत पदयात्रा काढून 'काशी' झाल्याचे सांगावे; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 PM2021-09-04T16:23:16+5:302021-09-04T16:25:57+5:30
फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली.
नांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे महाआघाडी सरकारकडून भ्रमनिरास झाला असल्यास राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी काशीपर्यंत पदयात्रा काढून महाआघाडीत येऊन आपली काशी करून घेतल्याचे सांगावे, असा सल्ला रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी दिला. आमदारकीच्या यादीतून नाव गळल्यानंतर शेट्टी यांनी करेक्ट कार्यक्रम करणार या प्रतिक्रियेवर खोत बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी दिलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपालांचा आक्षेप असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचे यादीतील नाव वगळ्याची चर्चा आहे. या प्रकारावर राजू शेट्टी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशाराच दिला आहे. यावर आता सदाभाऊ खोत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली. आता म्हणे ते जलसमाधी घेणार आहेत, एक दोन दिवसात ते जलसमाधी घेणार आहेत. पाहू काय होते ते. शेट्टी हे एनडीए प्रवेश करतील काय या प्रश्नावर खोत म्हणाले, त्यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा निर्णय आहे. आतापर्यंत किती पक्ष झाले अन कोणते राहिले याची यादी त्यांच्याकडे असेलच. करेक्ट कार्यक्रम हे उद्गार अपयश आणि उद्विग्नता यातून आले आहेत.
राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, राजू शेट्टी यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.