नांदेड शहरात सुरू आहेत केवळ ८ आधार केंद्र, नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:31 AM2021-02-06T04:31:33+5:302021-02-06T04:31:33+5:30
नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सुरू असलेल्या आधार केंद्रावर जाऊन सुरक्षित अंतर ठेवून तासन्तास बसावे लागत आहे. शहरात केवळ ...
नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सुरू असलेल्या आधार केंद्रावर जाऊन सुरक्षित अंतर ठेवून तासन्तास बसावे लागत आहे. शहरात केवळ आठच ठिकाणी आधार केंद्रे सुरू आहेत. त्यामध्ये इतवारा, छत्रपती चौक, राजकाॅर्नर आदी ठिकाणी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे कोरोना नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना आधार अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे लागते. अनेकदा कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आधार अपडेट होण्यास अडचणी येतात. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे तासन्तास बसावे लागते. इंटरनेट सुरळीत सुरू राहिले तरच अपडेटची प्रक्रिया पूर्ण होते; अन्यथा अर्धा तास वेळ लागतो. शहरात अत्यल्प असलेल्या आधार केंद्रामुळे नागरिकांना दुसरा पर्याय नाही. परिसरात असलेल्या आधार केंद्रावर सकाळपासून नागरिकांची रांग लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, पुरुष यांचा समावेश असतो. सकाळी रांगेत उभे राहिले तर दोन, अडीच तासांनंतर नंबर लागतो. त्यामुळे आधार केंद्रावर अनेकदा भांडणेही होतात.
चौकट- का करावे लागते आधार नूतनीकरण
नागरिकांना आधार कार्ड सर्व अत्यावश्यक कामांसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे आधार कार्डावरील सर्व माहिती अचूक पाहिजे. अनेकदा नागरिकांचा आधार कार्डावरील पत्ता बदलेला असतो. त्यामुळे जुना पत्ता वगळून नवीन पत्ता आधार कार्डावर असणे आवश्यक असते. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असते. तसेच नावात झालेला बदल किंवा जन्मतारखेतील चूक आधार कार्ड अपडेट करताना दुरुस्त करता येते.
चौकट- या भागात दुसरे आधार केंद्र नसल्याने या ठिकाणीच आधार अपडेट करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. आधार केंद्राची संख्या वाढवली तर नागरिकांची गर्दी होणार नाही. आधार अपडेटशिवाय इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांनाही तासन्तास थांबावे लागते. मध्येच इंटरनेट बंद पडल्यास पुन्हा वेळ वाया जातो. याची दखल प्रशासनाने घ्यावी. - सपंत मोहिते, तरोडा खु. नांदेड.
चौकट- मुलाच्या नावात बदल करण्यासाठी आधार अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन तास उभे राहून आधार अपडेट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. शहरात लोकसंख्येच्या तुलनेत आधार केंद्राची संख्या अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांना तासन्तास आपल्या कामासाठी थांबावे लागते. - राज गायकवाड, छत्रपती चौक, नांदेड.