कर्जमाफीचा लाभ नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:28 AM2019-04-13T00:28:43+5:302019-04-13T00:32:48+5:30
जुने कर्ज संपत नाही, नवे कर्ज मिळत नाही, अशी आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. राज्यात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
नांदेड : जुने कर्ज संपत नाही, नवे कर्ज मिळत नाही, अशी आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. राज्यात १५ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा कोणालाही फायदा झाला नाही. उलट गळ्यात पाटी टाकून शेतक-यांना गुन्हेगाराची वागणूक देणा-या भाजप सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.
महाआघाडीच्या प्रचारार्थ धर्माबाद तालुक्यातील करखेली, सिरजखोड, शहापूर येथे चव्हाण यांच्या सभा झाल्या. यावेळी आ. वसंतराव चव्हाण, तालुकाध्यक्ष दत्ताहरी चोळाखेकर, मारोतराव पवळे, दत्तू रेड्डी, कॉ. राजन्ना टेकूलवार, लक्ष्मण हाणेगावकर, माधव चोंडेकर, माधवराव सिंधीकर, जगन शेळके, डॉ. काकाणी, रमेश सरोदे, तौफीक मुलानी आदींची प्रमुख उपस्थिती होती. खा. चव्हाण म्हणाले, जनतेला आता भाजप सरकारवर विश्वास राहिला नाही. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे सरकार आले आहे. तो बदल महाराष्ट्रातही होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप सरकारकडून संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. राज्यातील वंचित बहुजन आघाडी भाजपला मदत करण्यासाठी उभी असल्याची टीकाही खा. चव्हाण यांनी केली. गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने जिल्ह्याकडे पाहिले नाही. केवळ झेंडावंदनासाठी पालकमंत्री नांदेडमध्ये आले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात किमान वेतनयोजना लागू करण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच प्रतिवर्षी ७२ हजार रुपये गरिबांना दिले जाणार आहेत. शेतकºयांवर कर्जासाठी गुन्हा दाखल होणार नाही, असाही उल्लेख जाहीरनाम्यात केला. काँग्रेस सामान्यांच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. हेच जाहीरनाम्यातून स्पष्ट होते.
आ. वसंत चव्हाण यांनी राज्यात विरोधी पक्षांच्या आमदाराला वेगळी वागणूक दिली जात असल्याचे सांगितले. रोजगार, शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी अशा अनेक घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. त्याचवेळी भाजप उमेदवाराने नांदेड जिल्ह्यासाठी काय योगदान दिले? असा सवालही आ. वसंतराव चव्हाण यांनी उपस्थित केला. यावेळी रमेश सरोदे यांनी अशोक चव्हाणांनी जिल्ह्याचा विकास केल्याचे सांगितले. त्याचवेळी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद चव्हाणांच्या पाठीशी उभी असल्याचेही ते म्हणाले. भिलवंडे यांनी भाजपचा प्रयोग यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगताना अशोकराव चव्हाण यांच्यासाठी वातावरण चांगले असल्याचे नमूद केले. यावेळी रघुनाथ टेकुलवार, मारोतराव पवळे, राजेन्ना रेकुलवार यांचीही समयोचित भाषणे झाली.
मुख्यमंत्र्यांना चव्हाणांचे प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांदेड येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी प्रत्युत्तर देताना लीडर कोण आणि डीलर कोण याची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली दिसत नाही. भाजपचा उमेदवार कशाचा डिलर आहे याची कदाचित त्यांना माहिती नसावी. त्यांनी आपल्या उमेदवाराची अगोदर माहिती घ्यावी आणि पुन्हा इतरांवर आरोप करावा, असेही त्यांनी सुनावले.