सगरोळीतील ‘त्या’ कुटुंबाना निवडणूकीचा पत्ताही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:26 AM2019-04-19T00:26:36+5:302019-04-19T00:27:47+5:30
एका बाजूला शासन मतदान वाढीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे येथे रोजी-रोटीसाठी आलेली ३५ ते ४० कुटूंबे निवडणूकीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
सगरोळी : एका बाजूला शासन मतदान वाढीसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे येथे रोजी-रोटीसाठी आलेली ३५ ते ४० कुटूंबे निवडणूकीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
सगरोळी परिसरात गेल्या तीन-चार वर्षापासून ये-जा करणारे रायगड जिल्ह्यातील खोपोली, रोहा, महाड तालुक्यातील भालगुल, सुधाकर पल्ली, परळी,जाबुपाडा,गणपत पल्ली तसेच पेण, आलिबाग व अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील लाकडवाडी येथिल आदिवासी जमातीतील गोपाळ वाघमारे, ताराबाई, बबन वाघमारे,जनाबाई बबन, पिंटू विकास, रेणुका पिंटू, सुनील घोगरकर, कविता घोगरकर, हरीचंद जाधव, बाळू, लालु पवार गंगाधर, मोहन अशी ३५ ते ४० कुटुंबे सगरोळी बोळेगावच्या पूर्व दिशेला मांजरा नदीच्या काठेवर तसेच लघूळ शिवारात पाल ठोकून वास्तव्यास आहेत. दिवसराञ किनाऱ्यावर असलेली काटेरी बाभूळ खोडमुळासकट तोडून जाळून त्यापासून कोळसा तयार करणे, आसपासच्या शहरात मागणी झाली तर विकणे नाहीतर पुणे, नगर, मुंबई या ठिकाणी गुत्तेदारामार्फत पाठवून यातूनच मिळणाºया पैशावर त्यांची उपजिविका चालते. एक मोठे बारदान थैली भरून १२० रुपये गुत्तेदार यांना देतो. सध्या या परिसरात वास्तव्यास तीस ते चाळीस कुटुंबे असल्याचे मुकादम म्हणून काम पहाणारे लालु पवार व जाधव यांनी सांगितले. सण, वार, उत्सव निवडणूकातही ही कुटूंबे कामावरच असल्याने ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाहित. विशेष म्हणजे जंगल शिवारात रहात असल्याने व गावगाड्याशी संबंध येत नसल्याने तसेच त्यांच्याकडे ना टी.व्ही.ना मोबाईल़ त्यामुळे निवडणूका व मतदान कधी आले आणि कधी झाले हेही या कुटूंबियांना माहित नसल्याचे दिसून आले.