स्वातंत्र्यापासून रस्ताच नाही; नांदेड जिल्ह्यातील पळसवाडी तांड्याची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:49 PM2019-09-21T13:49:08+5:302019-09-21T13:51:34+5:30

वन विभागाच्या किचकट नियमांमुळे रस्ता करण्यात अडचणी

There is no road from freedom; The road to Palswadi Tanda in Nanded district is awkward | स्वातंत्र्यापासून रस्ताच नाही; नांदेड जिल्ह्यातील पळसवाडी तांड्याची वाट बिकट

स्वातंत्र्यापासून रस्ताच नाही; नांदेड जिल्ह्यातील पळसवाडी तांड्याची वाट बिकट

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे प्रचंड हाल 

हदगाव (जि़ नांदेड) : देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली़; परंतु पळसवाडी (तांडा) या गावाला अद्याप रस्ताच नाही़ निवडणुकीच्या तोंडावर पुढारी येतात़ रस्ता होणारच अशी हमी देतात व निघून जातात़ मात्र, तीन पिढ्यांपासून गावाला रस्ताच नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच आजारी पडलेल्या व्यक्ती, बाळंतपणासाठी रुग्णांना हलविताना ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गटग्रामपंचायत म्हणून पळसवाडी तांडा सावरगावला जोडण्यात आला आहे़ मनाठ्यापासून ३ कि़मी़ अंतरावर हे गाव आहे़ गेली २५-३० वर्षांपासून येथील तरूण पिढी रस्त्याची मागणी करू लागली आहे़ मोठी अडचण म्हणजे वन विभागाच्या हद्दीतून हा रस्ता जातो़ त्यामुळे २० वर्षांपासून प्रयत्न करूनही काम रखडले आहे़नियमाप्रमाणे केवळ १ कि़मी़ पर्यंत १२-१५ फूट रुंद रस्ता वनविभाग देऊ शकते़ या गावातील अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा (५वी) पर्यंत संपल्यानंतर मनाठा येथे ये-जा करतात़  रस्त्यामध्ये एक मोठा नाला आहे़ पावसाळा जोरात झाला की, हा ओढा भरून वाहतो़ पाण्यातून कपडे भिजवत शाळेत जावे लागते़  गावातील रुग्णांचेही रस्त्याअभावी मोठे हाल होतात़  आठ महिने गावात डॉक्टर येतात; पण पावसाळ्यात वाहनच जात नसल्याने इकडे डॉक्टर फिरकत नाहीत़ पूर्वी बैलगाडीमध्ये आजारी व्यक्तीस आणत असत़ आता सावरगावमार्गे वाहनाने आणतात़ 

उपचाराअभावी सर्पदंश बेततो जिवावर
च्रस्ता जंगलातून जात असल्याने या गावात दरवर्षी सर्पदंशाने शेतकरी दगावतात़  शेतीत काम करताना सर्पदंश झाला तर त्याला रस्त्यामुळे दवाखान्यात लवकर नेता येत नाही़ ५० कि़मी़ नांदेड व ४० कि़मी़ तालुका (हदगाव) असल्यामुळे तोपर्यंत विष रुग्णाच्या अंगात भिनते व त्याचा मृत्यू होतो़ सुशिक्षित तरुणांनी मिळून गतवर्षी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली़ वन विभागाचे अधिकारी येऊन गेले. मात्र, त्यानंतरही समस्या ‘जैसे थे’ आहे़. याबाबत उपसरपंच वसराम राठोड यांना विचारले असता प्रशासनाकडे विनंती अर्ज करून आम्ही आता कंटाळलो असल्याचे त्यांनी सांगितले़
 

Web Title: There is no road from freedom; The road to Palswadi Tanda in Nanded district is awkward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.