माळेगाव यात्रेला वीजपुरवठ्याची अद्यापही जोडणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:47 AM2019-01-03T00:47:31+5:302019-01-03T00:47:56+5:30
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधांचीही वाणवा आहे़
माळेगाव : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला ४ जानेवारीपासून सुरुवात होत असून यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी प्राथमिक सोयीसुविधांचीही वाणवा आहे़ त्यामुळे भाविक अन् यात्रेकरुंना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ यात्रा दोन दिवसांवर येवून ठेपलेली असताना वीजपुरवठ्याची जोडणीही करण्यात आली नाही़
जिल्हा परिषद, पंचायत समिती लोहा व ग्रामपंचायत माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या यात्रेचे नियोजन केले जाते. माळेगाव यात्रेमध्ये राज्य व परराज्यांतून हजारो व्यापारी व यात्रेकरू डेरेदाखल झाले आहेत. मात्र ढिसाळ नियोजनामुळे यात्रेकरूंना पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा मिळाला नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून यात्रेसाठी दाखल झालेल्या व्यापाऱ्यांना रात्रभर अंधारात आपले साहित्य सांभाळण्याची वेळ येत आहे.
दरवर्षी माळेगाव यात्रेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो़ विकासकामांचे नारळही फोडण्यात येते़ परंतु, अद्यापही या ठिकाणी यात्रेकरुंसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे़ यात्रेत पिण्याचे पाणीही अद्याप उपलब्ध झाले नसल्यामुळे गैरसोय होत आहे़
वीज पुरवठ्याअभावी यात्रेकरू व व्यापाºयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. आढावा बैठकीमध्ये यात्रेकरूंना आठवडाभरापूर्वी विद्युत पुरवठा करण्याचे ठरले होते़ मात्र , आता यात्रा दोन दिवसांवर आली असताना येथील व्यापारी व यात्रेकरूंना विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा करण्यात आला नाही़
दरम्यान, यात्रेनिमित्ताने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ४ जानेवारी रोजी पशुसंवर्धनविषयक प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन व दुग्ध स्पर्धा होणार आहे़ तर ५ जानेवारी रोजी पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़
या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची नोंदणी करणे आवश्यक आहे़ नोंदणीची वेळ सकाळी ८ ते ११ अशी ठेवण्यात आली असून नोंदणीशिवाय रिंगमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे़ गुरुवारी देवस्वारीच्या एक दिवस अगोदर मोठ्या संख्येने यात्रेकरु माळेगावात डेरेदाखल होतात़
वैशाली जाधवच्या उपस्थितीने रंगणार लावणी महोत्सव
- माळेगाव यात्रेत ७ जानेवारी रोजी लावणी महोत्सव रंगणार आहे़ या महोत्सवासाठी यंदा सिनेतारिका तथा प्रसिद्ध नृत्यांगणा ढोलकीच्या तालावर फेम वैशाली जाधव यांना निमंत्रित करण्यात आले आहे़ त्यांच्यासह सुनीता लखनगावकर (मोडनिंब), आशारुपा परभणीकर, मीरा बबन पडसाळीकर, योगेश देशमुख (पुणे) यांचा संच आदींचा सहभाग असणार आहे़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सुरु होणा-या या महोत्सवाला आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़अब्दुल सत्तार, आ़ वसंतराव चव्हाण यांच्यासह पदाधिका-यांची उपस्थिती असणार आहे़
- माळेगाव यात्रेसाठी जवळच असलेल्या लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून टंचाईकाळातील ७० लाख रुपये लाईट बिल थकीत असल्यामुळे विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाही. सदरील बिलात पाच लाख रुपये जिल्हा परिषदेने भरले असून उद्यापासून पाणीपुरवठा चालू होणार आहे़-जि़प़सदस्य चंद्रसेन पाटील़
- यात्रेमध्ये व्यापारी व यात्रेकरू मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून त्यांना सुविधा पुरवण्याचे काम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरून चालू आहे़ व्यापा-यांना जागावाटप, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू आहे. ३ जानेवारीपासून पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे़-गोविंदराव राठोड, सरपंच़