विकासापासून कोसो दूर तुराटी आले प्रकाशझोतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:55 PM2018-11-12T23:55:54+5:302018-11-12T23:58:37+5:30
विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद्ग्रस्त शेतक-यांच्या वारसांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
उमरी : विकासापासून कोसोदूर असलेल्या तुराटी या गावातील पोतन्ना बलपीलवाड या ६० वर्षीय वृद्ध शेतक-याने कर्ज व नापिकीमुळे कंटाळून केलेल्या आत्मदहनानंतर गेली कित्येक वर्षे तुराटी गावाचे तोंडही न पाहिलेल्या राजकारणी व अधिका-यांनी आज या गावाकडे एकच गर्दी केली़ आपद्ग्रस्त शेतक-यांच्या वारसांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
भाऊबीजेच्या दिवशी पोतन्ना बलपीलवाड या शेतक-याने शेतामध्ये स्वत:चे सरण रचून आत्मदहन केले. बँकेचे कर्ज व सततची नापिकी या नैराश्यातून झालेल्या आत्मदहनाच्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील तुराटी या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील गावाला रस्ते, सिंचन, आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधांची वानवा आहे. वर्षानुवर्षे मागणी करूनही या गावाकडे कुणीही लक्ष देत नाही. हादरवून सोडणाºया शेतकºयाच्या या आत्मदहनानंतर मात्र सर्वच यंत्रणा खडबडून जागी झाली.
रविवारी आमदारांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींनी येथे भेटी दिल्या. महाराष्ट्रात असूनही आजवर आमच्या गावाकडे हे अधिकारी व राजकारणी यांनी भेट दिली नाही. आमचे प्रश्न जाणून घेतले नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य आ़ अमर राजूरकर यांनी यावेळी पक्षाच्या वतीने पन्नास हजार रुपये आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबीयांना रोख स्वरूपात दिले. आ़ वसंतराव चव्हाण यांनी या कुटुंबाला शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. भारतीय प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने पंकज शिवभगत यांनी सदर शेतक-याच्या शेतामध्ये पाणी लागेपर्यंत बोअर पाडून येत्या दहा दिवसांत विद्युत मोटार बसवून देण्याचे आश्वासन दिले.
तर राष्ट्रवादीचे उमरी तालुका अध्यक्ष व व्हीपीके उद्योगसमूहाचे मारोतराव कवळे यांनी पाच हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत दिली़ तसेच मयत शेतक-याच्या नातवांचा शिक्षणाचा खर्च पतसंस्थेच्या वतीने करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे राजेश पवार यांनी २१ हजारांची मदत या कुटुंबीयास दिली. गोला समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने प्रांताध्यक्ष नामदेवराव आईनवाड यांच्या वतीने अकरा हजार रुपयांचा धनादेश दिला.
याप्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, पंचायत समितीचे सभापती शिरीषराव देशमुख गोरठेकर, तहसीलदार श्रीकांत गायकवाड, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, तालुका कृषी अधिकारी एस.एन. पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेशराव पाटील कौडगावकर, दिगंबर सावंत, मधुसूदन चव्हाण, संदीप गोवंदे, बाबूराव शिंदे, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे, सरपंच दिलीपराव सावंत, लक्ष्मणराव सावंत, मुकुंदराव पाटील, पोलीस पाटील बाबूराव जोंधळे, गणेशराव आनेमवाड, भोजराज पाटील, मनोज पाटील जामगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती.