अपहरण करुन लुटणाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:29 AM2018-03-20T00:29:50+5:302018-03-20T00:29:50+5:30
मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळी चाकूचा दाखवून लुबाडणे, अपहरण करणे यासारखे गुन्हे करणा-या तिघांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले आहे़ आरोपींनी मरळक शिवारात एका कार- चालकाचे अपहरण केल्याची कबुली पोलिसांना दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळी चाकूचा दाखवून लुबाडणे, अपहरण करणे यासारखे गुन्हे करणा-या तिघांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले आहे़ आरोपींनी मरळक शिवारात एका कार- चालकाचे अपहरण केल्याची कबुली पोलिसांना दिली़
७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नांदेडहून वसमतकडे जाणारी कार मरळक शिवारात तिघांनी अडविली़ यावेळी कारचालकाला चाकूचा धाक दाखवून कारसह त्यांचे अपहरण केले़ कारचालकाला अपहरणकर्ते भाग्यनगर हद्दीत एका एटीएमवर घेवून गेले़ या ठिकाणी कारचालकाच्या एटीएममधील रक्कम काढून त्यांनी पोबारा केला़ या प्रकरणी कारचालकाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के, पोनि़चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चित्तरंजन ढेमकेवाड, सुभाष आलोने, सचिन गायकवाड, वैजनाथ पाटील यांच्याकडे सोपविला होता़ पोउपनि ढेमकेवाड हे पथकासह पेट्रोलिंग करीत असताना खबºयाकडून त्यांना या चोरट्याबाबत माहिती मिळाली़ पोलिसांनी मोबाईलचे दुकान असलेला शेख रफीक शेख अल्लाबक्ष रा़ कामठा, बॅन्ड पथकातील बबलू सोपान गायकवाड रा़वसंतानगर, शेख इम्रान शेख उस्मान रा़इस्लामपुरा या तिघांना ताब्यात घेतले़ पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ तपास पोउपनि जी़एग़ोटके, बालाजी सातपुते हे करीत आहेत़
गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ
शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून लुबाडल्याच्या घटना रोजच घडतात, परंतु यामध्ये बोटावर मोजण्याएवढ्या प्रकरणांतच गुन्हे दाखल केले जातात़ रात्रीच्या वेळी नांदेड ग्रामीण, भाग्यनगर, विमानतळ या हद्दीत मोठ्या प्रमाणात एकटे गाठून लुबाडल्याच्या घटना घडतात़ परंतु पोलिसांकडून ही प्रकरणे दाखलच करुन घेतली जात नाहीत असा अनुभव आहे़ त्यामुळे अशा आरोपींची हिंमत वाढते़ गुन्हा दाखल नसल्यामुळे तपासही केला जात नाही़ त्यामुळे हे आरोपी रेकॉर्डवर न आल्यामुळे सराईत होतात़