गोदाम फोडून चोरट्यांनी लांबविला २८ लाखांचा माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:29+5:302021-03-18T04:17:29+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदेडच्या ‘एमआयडीसी’ परिक्षेत्रातील डिजॉन कॅज्युअल्स प्रा.लि.चे मालक, व्यवस्थापक, तसेच नोकर व कर्मचारी १६ ...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नांदेडच्या ‘एमआयडीसी’ परिक्षेत्रातील डिजॉन कॅज्युअल्स प्रा.लि.चे मालक, व्यवस्थापक, तसेच नोकर व कर्मचारी १६ मार्च रोजी सायंकाळी रेडिमेड कपड्याचे गोदाम आणि किरकोळ विक्रीचे दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, तोंडाला कापड बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी १७ मार्च रोजी पहाटे गोदामाचे पाठीमागील शटर वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोदामात तब्बल तासभर थांबून गोदामातील सूट, शेरवानी, ब्लेजर, हेवी जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस आणि काउंटरमधील रोख ५०० रुपयांसह सुमारे २७ ते २८ लाख रुपये किमतीचे रेडिमेड ड्रेस चोरून नेल्याचे ‘डीजॉन’ कॅजुअल्स प्रा.लि.चे मालक दीपक प्रेमचंदाणी व व्यवस्थापक खान इरफान अली यांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोउपनि. शेख असद, पोउपनि. गणेश होळकर व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
चौकट........................
सीसीटीव्हीचे वायर तोडून दोन संगणकही लंपास
चोरट्यांनी प्रारंभी, गोदामातील सीसीटीव्हीचे वायर तोडून गोदामातील उपरोल्लेखित साहित्यांसह गोदामातील दोन संगणकही चोरून नेले असल्याचीही माहिती दीपक प्रेमचंदाणी यांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणी १७ मार्च रोजी सायंकाळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा गीते, तसेच मदतनीस पो.कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली.