चोरट्यांनी लुबाडले अन् पोलिसांनी ठाणे हद्दीवरून छळले; हतबल पित्याचे पोलीस अधीक्षकांकडे गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:22 PM2020-11-21T15:22:58+5:302020-11-21T15:28:18+5:30
आधीच चोरीने हैराण झालेल्या बाप-लेकीचा पोलिसांनीही छळ मांडला
नांदेड : परभणी जिल्ह्याती मानवत येथील माहेरी आपल्या पित्यासोबत जात असताना बसमध्ये एका विवाहितेचे दोन तोळ्याचे दागिने लंपास करण्यात आले. परंतु याबाबत तक्रार घेण्यास नांदेड ग्रामीण आणि कुंटूर पोलीस ठाण्यांनी हद्दीचे कारण सांगत नकार दिला. त्यामुळे शेवटी पित्याने पोलीस अधीक्षकांकडेच आपले गाऱ्हाणे मांडले. घडलेल्या घटनेमुळे हैराण झालेल्या बाप-लेकीचा पोलिसांनीही असा छळ मांडला होता.
विलास उद्धवराव पाटील रा.मानवत हे मुलीला नेण्यासाठी नायगांव तालुक्यातील कोलंबी येथे गेले होते. मुलीला घेऊन त्यांनी कहाळा ते नांदेड बसमध्ये प्रवास केला. नांदेड बसस्थानकावर आल्यानंतर त्यांना आपल्या जवळील दोन तोळ्याचे दागिने लंपास झाल्याचे समजले. यावेळी त्यांना संशयित चोरटे हे एमआयडीसी भागात उतरले असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी नांदेड ग्रामीण ठाणे गाठले.
परंतु या ठिकाणी त्यांना तुम्ही जिथून बसमध्ये बसले तिथे जा असे सांगितले. त्यानंतर पाटील हे कुंटूर ठाण्यात गेले. तिथे त्यांना तुम्हाला जिथे घटना कळाली त्या ठाण्याला जा असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे हैराण झालेल्या पाटील यांनी शेवटी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले. तसेच चोरीला गेलेले दागिने परत मिळवून देण्याची विनंती केली. दरम्यान, शहरात असलेल्या पाचही पोलीस ठाण्यात हद्दीवरुन अशाचप्रकारे तक्रारदाराची टोलवाटोलवी करण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे होत असल्याचे पुढे आले आहे.