नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांची सरसकट चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:43 AM2018-08-03T00:43:01+5:302018-08-03T00:43:29+5:30

देशाची भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदान करणारे शिक्षकच बदलीसारख्या बाबीसाठी बनावट कागदपत्रे सादर करीत असल्याचे पुढे आले आहे़ हा प्रकार गंभीर असल्याने घटनाबाह्य तसेच गैरव्यवहार करणाऱ्या अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आॅनलाईन बदली प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच चार हजाराहून अधिक शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचा ठराव गुरुवारी घेण्यात आला़

The thorough investigation of 4,000 teachers in Nanded district | नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांची सरसकट चौकशी

नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांची सरसकट चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देआॅनलाईन बदली प्रक्रिया : शिक्षण समितीचा ठराव; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : देशाची भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदान करणारे शिक्षकचबदलीसारख्या बाबीसाठी बनावट कागदपत्रे सादर करीत असल्याचे पुढे आले आहे़ हा प्रकार गंभीर असल्याने घटनाबाह्य तसेच गैरव्यवहार करणाऱ्या अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आॅनलाईन बदली प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच चार हजाराहून अधिक शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचा ठराव गुरुवारी घेण्यात आला़
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी शिक्षण समितीची बैठक पार पडली़ बैठकीला जि़प़सदस्य व्यंकटराव गोजेगावकर, मंगाराणी अंबुलगेकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, अनुराधा पाटील, ज्योत्स्ना नरवाडे प्रभारी शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, बी़आय़येरपूलवार आदींची उपस्थिती होती़ मेमध्ये शिक्षण विभागातील बदली प्रक्रिया पार पडली़ यामध्ये जिल्ह्यातील एकूण ४ हजार ५८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या़ या प्रक्रिये दरम्यान १ हजार ९५ शिक्षक अतिरिक्त ठरले होते़ यातील अनेक शिक्षकांचा प्रश्न अद्यापही कायम आहे़ याच शिक्षकांकडून बदली झालेल्या शिक्षकांनी बनावट कागदपत्रे सादर करुन बदली प्रक्रियेत लाभ उचलल्याचा आरोप झाल्याने जिल्हा परिषदेने तक्रारी प्राप्त झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती़
मागील दोन दिवसात या समितीने पहिल्या दिवशी ४८ तर दुसºया दिवशी ४४ अशा ९२ शिक्षकांची सुनावणी घेतली़
दरम्यान, समितीने शिक्षक तसेच तक्रारदारांची सुनावणी घेतली असता काही शिक्षकांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले़ यात दत्तकपत्रापासून बदलीच्या अंतराबरोबरच वैद्यकीय प्रमाणपत्रेही दिशाभूल करणारी तर काही बनावट असल्याचे निदर्शनास आले़ हाच मुद्दा गुरुवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत ऐरणीवर आला़ जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले़ पती-पत्नी एकत्रीकरणामध्ये काहींनी चुकीचे अंतर दाखविले आहे़ काहींच्या जन्म तारखेमध्ये खाडाखोड आहे़ तर काहींनी चक्क बोगस प्रमाणपत्रेच सादर केली आहेत़ असे शिक्षक पुढच्या पिढीला काय शिकवण देणार असा संतप्त सवाल करीत कागदपत्रांच्या तपासणीला उशीर झाला तरी हरकत नाही मात्र बदली प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची समिती नेमुन तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली़ धनगे यांच्या या मागणीला जि़प़सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी अनुमोदन दिले़ याबरोबरच इतर सर्व सदस्यांनी ही मागणी उचलून घेतल्यानंतर शिक्षण समितीने बदली प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व ४ हजार ५८ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा ठराव समितीने मंजूर केला़ त्यामुळे संवर्ग १,२ व ३ मधील सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची आता चौकशी होणार आहे़ दोषी शिक्षकांच्या तीन वेतनवाढी रोखाव्यात तसेच या शिक्षकांच्या सर्व्हीस बुकला तशी नोंद करावी़ अशी मागणीही समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे़ शिक्षण समितीच्या या ठरावामुळे शिक्षकांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे़
----
या शिक्षकांच्या कागदपत्रांची होणार तपासणी
अर्धापूर तालुक्यातील ६ मुख्याध्यापक, १५ पदवीधर, १४१ सहशिक्षक, भोकर - ७ मुख्याध्यापक, २२ पदवीधर, १९२ शिक्षक, बिलोली - ९ मुख्याध्यापक, १६ पदवीधर, १७२ शिक्षक, देगलूर - ९ मुख्याध्यापक, १० पदवीधर, २४७ शिक्षक, धर्माबाद - ६ मुख्याध्यापक, ८ पदवीधर, १४६ शिक्षक, हदगाव - ३० मुख्याध्यापक, ३५ पदवीधर, २७७ शिक्षक, हिमायतनगर - ६ मुख्याध्यापक, ०७ पदवीधर, १२३ शिक्षक, कंधार - ९ मुख्याध्यापक, १६ पदवीधर, ३२९ शिक्षक, किनवट - १२ मुख्याध्यापक, ४९ पदवीधर, ३३७ शिक्षक, लोहा - १३ मुख्याध्यापक, २३ पदवीधर, ३३३ शिक्षक, माहूर - ४ मुख्याध्यापक, १० पदवीधर, ११६ शिक्षक, मुदखेड - ५ मुख्याध्यापक, २५ पदवीधर, १४७ शिक्षक, मुखेड - १७ मुख्याध्यापक, २८ पदवीधर, ३९२ शिक्षक, नायगाव - ११ मुख्याध्यापक, २० पदवीधर, २१७ शिक्षक, नांदेड - २ मुख्याध्यापक, १४ पदवीधर, १६२ शिक्षक, नांदेड मनपा शाळा - १ मुख्याध्यापक, ५ पदवीधर, ३३ शिक्षक तर उमरी तालुक्यातील ०४ मुख्याध्यापक, २४ पदवीधर, ११७ शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी होणार आहे़
---
चौकशीसाठी तज्ज्ञाची समिती स्थापन करा
बदली प्रक्रियेत बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे येत आहे़ एका शिक्षकाने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे़ मात्र हे प्रमाणपत्र आमचे नसल्याचे आरोग्य समितीने स्पष्ट केले आहे़ मात्र या शिक्षकाबाबत कोणी आक्षेप घेतलेला नाही़ मग त्यावर कारवाई करायची नाही का? बदली प्रक्रियेसाठी पात्र असूनही काहींनी आॅनलाईन फॉर्म भरलेले नसल्याचेही पुढे आले आहे़ त्यामुळेच शिक्षकांच्या प्रमाणपत्राची सरसकट चौकशी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे़
- साहेबराव धनगे,
शिक्षण समिती सदस्य

Web Title: The thorough investigation of 4,000 teachers in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.