सचखंड गुरुद्वारा येथील तख्तस्नानात हजारो भाविकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:20 PM2020-11-14T12:20:24+5:302020-11-14T12:21:47+5:30
नगिनाघाट भागात श्री गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंगजी आणि संत बाबा नरिंदरसिंगजी यांनी स्वागत केले.
नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा येथे देश-विदेशातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत तख्त स्नान सोहळा पार पडला. यावेळी गुरुद्वारा परिसर आणि गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची गोदावरीच्या पाण्याने स्वच्छता करण्यात आली.
गुरुद्वारा बोर्डाचे प्रभारी अधीक्षक रणजितसिंह चिरागिया म्हणाले, सकाळी संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी तख्त स्नानाची अरदास केली. त्यानंतर दहा वाजता दरबार साहिब येथे भाई राम सिंहजी यांनी अरदास करून घागरिया सिंग यांना गोदावरीतून पाणी आणण्यासाठी रवाना केले. घागरिया सिंग भाई प्रकाशसिंग चिरागिया सकाळी साडेदहा वाजता भाविकांना घेऊन चांदीच्या घागरीत गोदावरीतून पाणी आणण्यासाठी गेले.
नगिनाघाट भागात श्री गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंगजी आणि संत बाबा नरिंदरसिंगजी यांनी स्वागत केले. घागरिया सिंग यांनी नगिनाघाट येथे गोदावरी नदीजवळ पोहोचून अगोदर नदीची पूजा केली. त्यानंतर पाणी भरून गुरुद्वाराच्या गुंबदला स्नान घालण्यात आले. दुसऱ्या फेरीत हजारो भाविकांनी गोदावरीतून पवित्र जल भरून तख्त स्नान केले. दरबारला सुंगधित पाणी, दूध आणि दहीमिश्रित पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींदरसिंग बुंगई, गुरमितसिंग महाजन, मनप्रीतसिंग कुंजीवाले यांच्यासह देश-विदेशातील शेकडो भाविकांची उपस्थिती होती, तसेच श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांची ऐतिहासिक शस्त्रे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. त्यानंतर त्यांचीही स्वच्छता केली.