२२ लाखांच्या ब्रँडेड कपडे चोरी प्रकरणात तीन आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:05 PM2021-03-26T16:05:48+5:302021-03-26T16:06:16+5:30
नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रामधील 'डिजॉन' कॅज्युअल्सच्या गोदामामध्ये चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या चोरट्यांनी १७ मार्च रोजी पहाटे चोरी केली होती.
नांदेड: नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रातील 'डिजॉन' रेडिमेड ड्रेसेसच्या गोदामाचे शटर वाकवून गोदामातील सुट, शेरवानी, ब्लेजर व जिन्स आदी सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना नांदेड ग्रामीण ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने २५ मार्च रोजी गजाआड केले. याप्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरट्यांकडून १८ लाख रूपयांच्या मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रामधील 'डिजॉन' कॅज्युअल्सच्या गोदामामध्ये चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या चोरट्यांनी १७ मार्च रोजी पहाटे सव्वातिन ते सव्वाचार वाजेदरम्यान शटर वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सीसीटीव्ही तोडून गोदामातील सुट, शेरवानी, ब्लेजर, जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस, दोन संगणक आणि काउंटरमधील रोख ५०० रुपया असा सुमारे २१ ते २२ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मालक दीपक प्रेमचंदाणी व व्यवस्थापक खान इरफान अली यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. तपासा दरम्यान पोलिसांना खबऱ्याकडून आरोपींबाबत माहिती मिळाली. यावरून ग्रामीण पोलिसांनी २५ मार्चच्या मध्यरात्री तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिगांबर तुकाराम धुमाळे (रा. वाघाळा, नांदेड), नामदेव संभाजी मुंडे (रा. श्रीपाद नगर, कौठा) व नरसिंग रामकिशन ओझा (रा. कालेजी टेकडी, जुना मोंढा, नांदेड) असे अटकेतील आरोपींची नावे असून त्यांच्याकडून चोरीचा १८ लाखांचा मुद्देमाल जात जप्त करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक सिध्देश्वर भोरे व प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली 'डीबी' तथा गुन्हे शोध पथकप्रमुख पोउपनि. शेख असद आणि त्यांचे अन्य सहकारी कर्मचारी नाईक पो. कॉ. प्रभाकर मलदोडे, श्याम नागरगोजे, प्रमोद कऱ्हाळे व संतोष जाधव, पो. कॉ. शिवा पाटील, नामदेव मोरे, रेवणनाथ कोरनुळे, विश्वनाथ पवार व चंद्रकांत स्वामी यांच्यासह सहायक पोउपनि. सुरेश पुरी आणि नाईक पो. कॉ. राजू हुमनाबादे यांनी केली. दरम्यान, न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे अंमलदार परमेश्वर कदम व लेखनिक पो. कॉ. नामदेव मोरे यांनी दिली आहे. आरोपींकडून अनेक चोरी व घरफोड्यांची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामीण पोलिसांकडून वर्तविण्यात आली.