तीन आरोपी अटकेत, इतरांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:42 AM2018-10-03T00:42:58+5:302018-10-03T00:43:19+5:30
नगर परिषदेत अग्निशमन दलाच्या नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली. याप्रकरणात १५ आरोपी असून, न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : नगर परिषदेत अग्निशमन दलाच्या नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी तिघांना अटक केली. याप्रकरणात १५ आरोपी असून, न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा नोंद झालेल सर्व आरोपींना अटकेच्या मागणीसाठी तक्रारदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह २ आॅक्टोबर गांधी जयंतीदिनी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
येथील नगर परिषदेत सन २०१५ मध्ये अग्निशमन दलात झालेल्या नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, तत्कालीन नगर अभियंता (विद्युत) गजानन सावरगाकर, तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता श्रीहरी चोंडेकर, तत्कालीन लेखापाल रामसिंग लोध यांच्यासह १५ आरोपींविरुद्ध तीन महिन्यांपूर्वी भोकर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून यातील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. याबाबत तक्रारदार नगरसेविका अरुणा देशमुख यांनी वेळोवेळी संबंधितांना निवेदन देवूनही आरोपी मुक्तपणे वावरत आहेत. यास पोलीस प्रशासनास जबाबदार धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शिवसेना कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारपासून तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करुन आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या आशयाचे निवेदन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना दिले. आंदोलनात रा.काँ. तालुकाध्यक्ष सुभाष घंटलवार, नगरसेवक तौफिक ईनामदार, शेख वकील, शिवाजी पाटील किन्हाळकर, डॉ. फेरोज इनामदार, उत्तम बाबळे, जवाजोद्दीन बरबडेकर, मोहण पाटील हस्सापूरकर, चंद्रकलाबाई गायकवाड, राजेश देशमुख, सेनेचे माधव वडगावकर, सुभाष नाईक यांच्यासह तालूक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते. आंदोलनावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
सदर गुन्ह्यातील १५ आरोपी मधील त्रिरत्न कावळे, महेश दरबस्तवार, दिलीप देवतुळे या तीन आरोपींना भोकर पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटक केली आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.