शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातून तीन आरोपी पसार; उमरी येथील घटना, पोलिसांची शोधमोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 06:35 PM2022-07-03T18:35:07+5:302022-07-03T18:35:19+5:30
मारहाण प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्याचे समजताच आरोपींनी उमरी न्यायालयातून पलायन केले.
उमरी (जि. नांदेड): सुनावणीदरम्यान न्यायालयातून तीन आरोपींनी पळ काढल्याची घटना घडली आहे. मारहाण प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्याचे समजताच आरोपींनी उमरी न्यायालयातून पलायन केले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र, अद्याप त्यांना यश मिळाले नाही.
अविनाश निवृत्ती क्षीरसागर (वय ३७), प्रकाश रमेश क्षीरसागर (२९), रमेश माणिका क्षीरसागर (तिघेही रा. कोल्हा, ता. मुदखेड) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. २०१२ मध्ये उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हा या गावात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात एक जुलैला दुपारी या तिन्ही आरोपींना न्यायमूर्ती ए. बी. रेडकर यांनी तीन वर्षांचा कारावास व प्रत्येकी ३५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. यानंतर या आरोपींना पोलीस जमादार हणमंत सुगावे यांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपींना न्यायालयाबाहेर नेत असताना अचानक तिन्ही आरोपींनी संगनमत करून पोलिसांच्या हाताला झटका मारला व पळून गेले. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते हाती लागले नाहीत. याबाबत जमादार सुगावे यांच्या तक्रारीवरून उमरी पोलिसांत फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत घेण्यासाठी तपास पथके रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिली.