मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना खंजीरचा धाक दाखवून लुटणारे तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:32 PM2021-05-12T17:32:02+5:302021-05-12T17:32:59+5:30

लोकांवर पाळत ठेवून त्यांना गाठल्यानंतर खंजीरचा धाक दाखवून लुबाडण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस

Three arrested for threatening a morning walker with a dagger | मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना खंजीरचा धाक दाखवून लुटणारे तिघे अटकेत

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना खंजीरचा धाक दाखवून लुटणारे तिघे अटकेत

Next
ठळक मुद्दे रेल्वेस्टेशनकडून शासकीय रुग्णालयाकडे विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून तिघे जण जात होते. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांची हालचाल संशयास्पद वाटली.

नांदेड : सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना हेरून खंजीरचा धाक दाखवून शहरात अनेकांना लुबाडणाऱ्या या टोळीतील तिघांना वजिराबाद पोलीस ठाण्यातील डीबीच्या पथकाने ७ मे रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड शहराबाहेरील रस्त्यावर सकाळी अनेक नागरिक फिरायला जातात. त्यात वृद्ध मंडळींचा समावेश जास्त असतो. अशा लोकांवर पाळत ठेवून त्यांना गाठल्यानंतर खंजीरचा धाक दाखवून लुबाडण्यात येत होते. मात्र, हे चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. ७ मे रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास वजिराबाद पोलीस ठाण्याचे डीबीचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी रेल्वेस्टेशनकडून शासकीय रुग्णालयाकडे विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून तिघे जण जात होते. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांची हालचाल संशयास्पद वाटली. त्यानंतर ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. १ मे राेजी सामाजिक न्याय भवन रस्त्यावर खंजीरचा धाक दाखवून दोघांना लुबाडण्यात आले होते. या प्रकरणात मुरलीधर कऊटकर यांनी विमानतळ ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही चोरीची होती.

टोळीत अल्पवयीन मुलगाही
सोमवारी या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. त्याच्याकडून चोरीतील अंगठी जप्त करण्यात आली. डीबीच्या या पथकात सपोनि. सोमनाथ शिंदे, पोहेकॉ. दत्तराम जाधव, विजय नंदे, बबन बेडदे, बालाजी कदम, संतोष बेलुरोड, शरदचंद्र चावरे, चंद्रकांत बिरादार, व्यंकट गंगुलवार यांचा समावेश होता.

Web Title: Three arrested for threatening a morning walker with a dagger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.