बामणी येथे तीन मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू
By प्रसाद आर्वीकर | Published: September 28, 2023 08:38 PM2023-09-28T20:38:49+5:302023-09-28T20:39:16+5:30
अचानक खोल पाण्यात गेल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत.
बिलोली ( नांदेड) : तालुक्यातील बामणी येथील तीन मुलांचा कृषी विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या कुंट्यातील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला आहे. यात दोघा सख्या भावांचा समावेश आहे.
बिलोली पासून ९ कि.मी.अंतरावर असलेल्या बामणी येथे कृषी विभागाच्या कुंट्यात पाझर तलाव काढण्यात आला आहे. या तलावात आज ( दि.२८ ) दुपारी १२ ते १ च्या दरम्यान येथील वैभव पंढरी दुधारे( वय१४) व बालाजी पिराजी गायकवाड (वय १३) व देवानंद पिराजी दुधारे (वय ११) हे तिघे तलावाच्या कडेला पोहत होते. अचानक खोल पाण्यात गेल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत.
पंढरी दुधारे यांना २ मुलं १ मुलगी आहे.यातील एका मुलाचा या आधीच मृत्यू झाला होता. आज दुसरा मुलगा वैभव बुडून मृत पावला. तर दुसरे पिराजी गायकवाड यांना ही २ मुलं १ मुलगी असे अपत्य आहेत. गायकवाड यांच्या दोन्ही मुलांचा आज बुडन मृत्यू झाला. या दोन्ही कुटूंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने बामणी गावावर शोककळा पसरली आहे.